सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पुणे येथील राष्ट्रीय कॅडेट कोर (एन. सी. सी.) ग्रुप मुख्यालयात महाराणी ताराबाई विद्यालय- तळबीड या शाळेच्या एन. सी. सी. युनिटला ग्रुप कमांडर ब्रिगेडियर लिमये यांच्या हस्ते एन.सी.सी.ध्वज प्रदान करण्यात आला. हा ध्वज पंचक्रोशी शिक्षण मंडळच्या अध्यक्ष चित्राताई कदम – माने यांनी महाराणी ताराबाई विद्यालयाच्या वतीने सन्मानाने स्वीकारला. या कार्यक्रमास ब्रिगेडियर आर. के. गायकवाड, ग्रुप कॅप्टन आर. एस. जाधव हे वरिष्ठ ऑफिसर उपस्थित होते.
यावेळी चित्राताई कदम – माने म्हणाल्या की, रहिमतपूर पंचक्रोशी शिक्षण मंडळाची वाटचाल तसेच रहिमतपूर येथील सैनिकी परंपरा व माने घराण्याचा बडोद्याच्या संस्थानाशी घनिष्ट संबंध आहे. माने आणि मोहिते घराणी एकत्र येऊन गेली वीस वर्षे महाराणी ताराबाई विद्यालय चालवत आहेत. या विद्यालयाच्यावतीने एन.सी.सी. च्या पुढील कारकिर्दीसाठी शक्यतो सर्व सहकार्य केले जाईल.
ब्रिगेडियर सुनील लिमये यांनी तळबीड गावचा तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते, महाराणी ताराबाई यांच्या कार्याचा गौरव केला आणि राष्ट्रीय कॅडेट कोर – एअर फॉर्स स्क्वाड्रन सबयुनिट मिळाल्याबद्दल शाळेतील पदाधिकारी यांचे स्वागत केले. यावेळी ब्रिगेडियर सुनील लिमये यांचा मराठा धोप तलवार, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तैलचित्र देऊन ग्रामपंचायतीतर्फे कॅप्टन मोहिते आणि सरपंच जयवंत मोहिते यांनी सत्कार केला.
यावेळी ग्रुप कॅप्टन आर एस जाधव यांचाही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे चित्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक सलीम ढालाईत, शाळेचे केअर टेकिंग ऑफिसर ज्ञानेश्वर कोळी, तळबीड येथील परंतु पुण्याच्या सैनिकी शाळेमधून दहावी उत्तीर्ण झालेले कुमारी राजकुंवर मोहिते इतर विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.