मुंबई प्रतिनिधी |भाजपने आपली चौथी यादी जाहीर करत तिकीट वाटपाचा कार्यक्रम आटपला आहे. यामध्ये विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांना ब्रेक लावत त्यांचे तिकीट कापले आहे. तर मुक्ताई नगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कुलाब्यात विद्यमान आमदाराचे तिकीट कापत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जावयाला तिकीट देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप हे वादळी ठरण्याची शक्यता याआधीच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली होती. कारण भाजपने केलेली इनकमिंग त्याला कारणीभूत होती. बंडाळी फुटाफुटी याचा सामना करण्यात भाजपला सध्या तरी यश आले आहे. तरी देखील काही जागा या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जाहीर नकरण्याची नामुष्कीचा देखील भाजपवर आल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात भाजपला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान विधान परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाल्याने रामराजे नाईक निंबाळकरांचे सभापती पद धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी भाजप आथवा शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाचा एक भाग म्हणून त्यांच्या जावयाला कुलाबा मतदारसंघातून निवडणुकीला उभा करण्याचा डाव भाजपने खेळला आहे.
चौथ्या यादीत जाहीर झालेली नावे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
काटोल – चरणसिंह ठाकूर
तुमसर – प्रदीप पडोले
नाशिक (पूर्व)- राहुल ढिकले
बोरिवली – सुनील राणे
घाटकोपर (पूर्व) – पराग शाह
कुलाबा – राहुल नार्वेकर