हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जगभरातील ऐतिहासिक आणि भव्य शिल्पनिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार (Ram Sutar) यांना राज्य सरकारतर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या निर्णयाची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून राम सुतार यांना हा सन्मान मिळावा अशी मागणी होती. अखेर आज राज्य सरकारने त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
राम वंजी सुतार यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील गोंदूर या छोट्याशा खेड्यात झाला. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असली तरी लहानपणापासूनच त्यांना शिल्पकलेची आवड होती. त्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळावी यासाठी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला आणि तिथे शिल्पकला व प्रतिरुपण विषयातील पदविका मिळवली.
महात्मा गांधींच्या शिल्पनिर्मितीमधील योगदान
राम सुतार यांना महात्मा गांधी यांच्या शिल्पनिर्मितीसाठी विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. जगभरातील 50 हून अधिक देशांमध्ये त्यांच्या हस्तकलेतून साकारलेल्या महात्मा गांधींच्या मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत. भारतीय संसद भवनातील गांधीजींचे शिल्पही त्यांनीच साकारले आहे. आतापर्यंत त्यांनी 1,000 पेक्षा जास्त महात्मा गांधींच्या मूर्ती तयार केल्या आहेत.
स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार
राम सुतार यांचे सर्वांत भव्य कार्य म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे जगातील सर्वात उंच (182 मीटर) शिल्प. या भव्य कलाकृतीच्या निर्मितीदरम्यान ते अनेक महिने गुजरातेत राहून कार्यरत होते. त्याशिवाय पंडित जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत आणि अन्य महान नेत्यांची शिल्पे त्यांनी तयार केली आहेत.
दरम्यान, राम सुतार यांच्या याच थोर कार्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्याचा निर्णय घेतला. विधिमंडळात याबाबत घोषणा करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राम सुतार यांच्या शिल्पकलेचे कौतुक केले आणि त्यांचे योगदान अविस्मरणीय असल्याचे सांगितले.