हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत दिले होते. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. परंतु अशातच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठं पाऊल उचललं आहे. शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्र-मध्यप्रदेशची सीमा सील करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत कि, ‘स्वत:ला प्रेरित करण्याव्यतिरिक्त दुसऱ्यांना शिकवण देणंही आवश्यक आहे. याशिवाय लोकांशी सक्तीनं वागणंही आवश्यक आहे,” जर जिल्ह्यांमधील स्थिती बिकट झाली तर जिल्हाधिकारी हे लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतात. रविवारपासून कोणत्याही जिल्ह्याला लॉकडाऊन लावण्याची परवानगी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय मास्क परिधान न करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येईल. तसंच त्यांना ओपन जेलमध्येही ठेवण्यात येईल. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स वाढवण्याचेही निर्देश चौहान यांनी दिले.
“आमच्या शेजारी राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती भयावह आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये स्थिती संकटजनक आहे. आम्ही महाराष्ट्राची सीमा सील केली आहे. छत्तीसगढमधून येण्याजाण्यावरही निर्बंध घातले जातील,” महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केवळ मालवाहतूक, अत्यावश्यक सेवा आणि आपात्कालिन सेवांसाठी मंजुरी दिली आहे. शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठकीचं आयोजन केलं आहे. त्यानंतर त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना मास्क परिधान करणं आवश्यक असल्याचं म्हटल आहे.