छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ येथील महाराष्ट्र बॉर्डर कर्नाटक सरकारकडून सील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । कर्नाटकच्या बंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनानंतर मिरजेत शिवसैनिकांकडून कर्नाटकच्या वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे.त्यानंतर कर्नाटक सरकारकडून कागवाड येथील कर्नाटक राज्याची बॉर्डर बंद करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून कर्नाटक आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. तर कर्नाटकच्या कागवाड येथे कन्नड वेदिका रक्षक संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करत शिवसेनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर संतप्त पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत.

मिरज शहरांमध्ये शिवसैनिकांच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करण्यात आला आहे. शहरातील कन्नड व्यवसायिक आणि कर्नाटकात येणाऱ्या एसटी आणि खाजगी वाहनांवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे. तर या घटनेनंतर कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा सील करण्यात आली आहे. मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ येथील कर्नाटक राज्याच्या कागवाड या ठिकाणी बॉर्डर सील करण्यात आली आहे. मोठा पोलिस बंदोबस्त कर्नाटक पोलीस प्रशासनाकडून येथे तैनात करण्यात आला आहे.

या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्याही वाहनधारकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवेश देण्यात येत नाही. तर दुसर्‍या बाजूला कर्नाटक मधून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून कर्नाटककडे जाणाऱ्या सर्व एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाकडून ही पाऊले उचलण्यात आली आहेत.तर मिरज शहरांमध्येही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मिरज आणि कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या कागवाड या ठिकाणी कन्नड वेदिका रक्षक संघटनेच्यावतीने शिवसेनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.

Leave a Comment