आज २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. यंदाची निवडणूक भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा समोर ठेवून लढली होती हे जगजाहीरच आहे. साधारण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून व्यक्तीचा चेहरा देऊन निवडणूक लढण्याकडे पक्षांचा कल राहिला. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल, बिहारमध्ये नितीशकुमार किंवा आसाममध्ये सर्बानंद सोनोवाल असुदे निवडणूक त्यांना केंद्रित मानूनच पुढे गेली. ज्या निवडणुकीत नेत्याच्या कार्यक्षमता आणि लोकप्रियतेविषयी शंका येईल किंवा पक्षातच अंतर्गत कलहाचं वातावरण निर्माण होईल त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणं टाळलं जातं. उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ, गुजरातमध्ये विजय रुपानी यांची नावं निकालानंतर समोर करण्यात आली. या सर्वांमागे पक्ष नेतृत्व जरी महत्त्वाची भूमिका बजावत असलं तरी नेत्यांची वैयक्तिक महत्त्वकांक्षाही दुर्लक्षित करता येत नाहीच. महाराष्ट्राच्या बाबतीत अशी महत्वकांक्षा बाळगलेले पण ती पूर्ण होऊ न शकलेले नेते कोण आहेत, थोडक्यात पाहुयात.
१) पतंगराव कदम – वयाच्या १९ व्या वर्षी सक्रिय राजकारणात सहभाग घेणाऱ्या पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठ सारखी शैक्षणीक संस्था उभारून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं बस्तान बसवलं. काँग्रेस पक्षाचं काम करत असताना त्यांनी सांगली, सातारा , कोल्हापूर या भागात पक्षवाढीसाठी खूप काम केलं. आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रीपदही मिळत होतं. परंतु क्षमता आणि पात्रता असतानाही मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही.
२) नितीन गडकरी – भाजपमधील ज्येष्ठ नेते असलेल्या नितीन गडकरींना ‘शत्रूलाही मित्र करेल’ अशा स्वभावासाठी ओळखलं जातं. भाजप पक्षातील प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्या त्रिकुटाने आज उभ्या असलेल्या महाराष्ट्र भाजपची पायाभरणी केली आहे. अनेक गोष्टींचा व्यासंग असलेल्या गडकरींना भाजपचं अध्यक्षपद आणि दोनदा केंद्रात मंत्रीपद देण्यात आलं. केंद्रात गडकरी स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांचेच शिष्य असलेले देवेंद्र फडणवीस राज्यशकट हाणायला सिद्ध झाले. आता इच्छा असूनही गडकरींना महाराष्ट्रात बोलावलं जात नाही त्यामुळे त्यांचंही मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न अधुरच आहे.
३) अजित पवार – आघाडी सरकारच्या काळात केवळ काँग्रेस पक्ष मोठा आहे म्हणून उपमुख्यमंत्री पदावर अजित पवारांची बोळवण झाली. जलसंपदामंत्री हे खातं सांभाळत असताना अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. काकांच्या म्हणजेच शरद पवारांच्या मर्जीशिवाय त्यांचं राजकारणातील पान हलणार नाही हे माहीत असल्यामुळेच त्यांच्या मुख्यमंत्र्यांपदालाही मर्यादाच आल्या.
४) उद्धव ठाकरे – ज्या घराण्यातील माणसं निवडणुकीलाच उभी राहत नाहीत ते मुख्यमंत्र्यांपदावर हक्क कसा सांगणार असं एकूण चित्र असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र २०१२ ते २०१८ कालावधीत मुख्यमंत्रीपदासाठी खूप कयास करून पाहिला. चुलतबंधू राज ठाकरे यांची पात्रता डावलून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धवच्या गळ्यात पक्षप्रमुख पदाची माळ घातली आणि तिथून पुढची सगळीच गणितं बिघडली. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मिता, हिंदुत्ववाद रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ठाकरे कुटुंबाला मागील ५ वर्षांत भाजप सरकारने माघार घ्यायला भाग पाडलं आहे. पक्ष स्थापन होऊन पन्नाशी गाठलेली असताना शिवसेना अजूनही स्वबळावर निवडून येऊ शकली नाही. यंदाच्या निवडणुकीत तर आदित्य ठाकरेंनाच समोर केल्याने, आणि येत्या काळात तरुण नेतृत्वाचाच विचार केला जाईल या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांचंही मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं आहे असं समजायला हरकत नाही.
५) रामदास आठवले – सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट या डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कुणासाठी परफेक्ट असेल तर ते रामदास आठवले आहेत. सरकार कुणाचं आहे याचा त्यांना फरक पडत नाही. मी माझ्या लोकांसाठी सत्तेसोबत जाणं पसंद करणार ही त्यांची सरळ भूमिका असते. त्यामुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सेना-भाजप युती यांच्यासोबतही सत्तेचा लाभ मिळाला असल्याचं पहायला मिळेल. आंबेडकर विचारांनी प्रेरित आपलं काम असल्याचं ते सांगतात. त्यांच्या अनेक भूमिका वादग्रस्त असल्या तरी आपण जसे आहोत तसं असण्यातच आपलं आणि पक्षाचं शहाणपण आहे हे ते कबूल करतात. मुख्यमंत्रीपदाचा विचार मात्र त्यांच्या बाबतीत कोसो दूर आहे असंच म्हणावं लागेल. कारण मतांचं राजकारण करण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवलं जाऊ शकतं, पण मुख्यमंत्री, प्रधानमंत्री या पदावर त्या त्या कार्यक्षमतेचाच माणूस आवश्यक असतो.
बाकी म्हणाल तर छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, आर.आर.पाटील या नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा लाभ घेतलाच. हे नेते त्या पक्षातील दुसऱ्या फळीचे नेते मानले जात होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी लावावी लागणारी सेटिंग त्यांच्या आवाक्याबाहेरचीच होती. प्रमोद महाजन यांचा खून झाल्यामुळे त्यांची संधीही हुकली. अजून काही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री राजकारण करत आहेत. त्यांना संधी आहेच. पण वयाची पन्नाशी पार केलेले हे वरचे नेते, आता मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दिसतील अशी सुताराम शक्यता नाही.