हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Congress । राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ही घोषणा केली आहे. आज मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या शिबिरात चेन्निथला यांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी मध्ये फूट पडली हे स्पष्ट झालं आहे.
इतर कोणासोबत न जाण्याचा निर्णय- Maharashtra Congress
आज कॉंग्रेसचे (Maharashtra Congress) महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, मुंबई कॉंग्रेसचे प्रभारी यू.बी. वेंकटेश यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई काँग्रेसतर्फे एक दिवसीय शिबिर मालाड येथे पार पडले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,मुंबई अध्यक्ष उपस्थित होते. याच शिबिरात काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. “स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे. बीएमसी निवडणूक स्वबळावर लढावी, अशी भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडली आणि मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित शिबिरात हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
काँग्रेसचा स्वबळाची नारा म्हणजे ठाकरे गटाला धक्का असल्याचे बोलले जात आहे. कारण एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरु असतात. राज ठाकरे हे महाविकास आघाडीत येतील असेही बोललं जात होते. जर काँग्रेस आणि राज ठाकरे एकत्रितपणे महाविकास आघाडीत राहिले असते, तर मराठी मते आणि काँग्रेसची पारंपरिक मते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा मिळाली असती. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईतील काँग्रेसचा (Maharashtra Congress) पाठीराखा उद्धव ठाकरेंसोबत उभा राहिला होता हे आकडेवारी वरून स्पष्ट झालं होते. आता मात्र काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने उद्धव ठाकरेंना हा एक प्रकारचा झटका म्हणावा लागेल.
एकीकडे काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मात्र काँग्रेसने थोडा सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत (NCP) काँग्रेसची नेहमी नैसर्गिक आघाडी राहिली आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. परंतु शरद पवार अशावेळी काय निर्णय घेणार? ते काँग्रेससोबत मुंबई महापालिका निवडणूक लढवणार कि ठाकरे बंधूना सोबत घेणार हे बघायला हवं.




