विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार! शरद पवारांच्या विधानावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

मुंबई । काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद आता खुले झाले आहे, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताच नाना पटोले यांनी आज त्यावर परखड मत मांडलं. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि काँग्रेसकडेच राहील. काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणाला अध्यक्ष करायचे याचा निर्णय घेतील, असेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.

नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पदग्रहण समारंभाच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर नाना पटोले माध्यमांशी बोलत होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक १ चा पक्ष बनवून दाखवेन, असा विश्वास नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा व्यक्त केला.

नाना पटोले यांनी यावेळी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरही भाष्य केलं. ”मोदी सरकारच्या हुकूमशाही वृत्तीमुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ७० दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. आता या देशात भाजप विरुद्ध शेतकरी अशी लढाई सुरु झाली असून काँग्रेस पक्ष या लढाईत शेतकऱ्यांसोबत आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातूनही मोठे बळ देऊ,” अशी पुष्टीही पटोले यांनी दिली.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like