‘दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, पण आता ते मी असं बोललोचं नाही’, असं स्पष्टीकरण देतील’- अजित पवार

मुंबई । दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही दानवेंवर निशाणा साधला आहे. ‘दानवे यांचं हे वक्तव्य तथ्यहीन आहे. शेतकरी आंदोलन करत असताना असं बोलायला नको होतं. पण ते मी असं बोललोचं नाही’, असं स्पष्टीकरण नंतर ते देतील, असा टोलाही अजितदादांनी लगावला आहे. (farmer protest)

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारनं हटवादीपणा सोडायला हवा, असं म्हटलंय. केंद्र सरकारच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करतात पण तोडगा निघत नाही. हा कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही, त्यामुळे आधीचाच कायदा कायम ठेवावा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

दानवेंच्या वक्तव्यावरुन राऊतांचा केंद्राला टोला
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक शैलीत समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याची पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. आपण चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या दानवे यांनी हे वक्तव्य केले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी सबळ पुरावे असणारच. यावर केंद्रीय मंत्रिमंडळातही चर्चा झाली असेल. त्यामुळे लडाखमधील चिनी सैन्याच्या घुसखोरीकडे तुर्तास दुर्लक्ष करा. पण सिंघू बॉर्डरपर्यंत आतमध्ये शिरलेल्या चीनला सर्वप्रथम रोखले पाहिजे. दानवेंचे वक्तव्य प्रमाण मानून आपण भारतात अराजक आणि अशांती माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनवर आपण हल्ला केला पाहिजे, असा जोरदार टोला राऊत यांनी केंद्राला लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’