बुलडाणा प्रतिनिधी । महाराष्ट्रातील दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितआहे . या दोन्ही काँग्रेसने राज्यात ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला आहे. हा घोटाळा झाला नसता तर महाराष्ट्रातील इंच-इंच जमीन ही सिंचनाखाली आली असती , ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. शेतकरी मोडून पडला हे पाप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. असा आरोप शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी बुलढाणा येथे केला.
बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ बुलढाणा शहरातील गांधी भवन येथे शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जनतेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते . ते पुढे म्हणाले की, ‘या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात रखडलेले विविध सिंचन प्रकल्प मार्गी लागले. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने बळीराजा जलसंजीवनी योजने मार्फत हे प्रकल्प पुन्हा प्रगतीपथावर उभे केले जात आहे. आम्हाला महाराष्ट्रातील शेतकरी उभा करायचा आहे. आणि शेतकऱ्यांना उभे करण्यासाठीच आम्हाला महाराष्ट्रात पुन्हा सत्ता हवी आहे.’