महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. मात्र आता महाराष्ट्राच्या अभिमानाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले भव्यदिव्य मंदिर उभारले गेले आहे. १७ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत या मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी राज्यभरातील शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि अस्मितेचे रक्षण करणारे सर्वजण मोठ्या उत्साहाने प्रतीक्षा करत आहेत.
गडदुर्गाच्या भव्यतेत शिवमंदिराचा जन्म
हे मंदिर केवळ भक्तांसाठी एक पूजास्थळ नसून, मर्द मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाचा प्रतीकात्मक गड आहे. सिंहासनारूढ ६ फूट उंच अखंड कृष्णशिला मूर्ती येथे प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. या मूर्तीचे शिल्पकार आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मूर्तिकार अरुण योगीराज. मंदिराची रचना गड-किल्ल्यांच्या धर्तीवर करण्यात आली असून, ५६ फूट उंच मंदिर, ४२ फूट उंच प्रवेशद्वार आणि तटबंदीने सुरक्षित असलेला हा परिसर इतिहास जिवंत करणारा आहे.
मंदिराच्या तटबंदीवर ३६ विशेष चबुतऱ्यांवर शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे देखावे साकारण्यात आले आहेत, जे मराठी, हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध असतील. शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण केंद्र, गुरुकुल शिक्षण आणि ऐतिहासिक प्रदर्शन यामुळे हे मंदिर महाराष्ट्राच्या अस्मितेचे नवे प्रेरणास्थान ठरणार आहे.
१७ मार्चला साक्षीदार व्हा या ऐतिहासिक सोहळ्याचे
१४ ते १७ मार्चदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १७ मार्चला मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण विधी होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंदिराचे भव्य लोकार्पण होईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा सोहळा केवळ एका मंदिराच्या लोकार्पणाचा नाही, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा उत्सव आहे. शिवभक्तांनी आणि इतिहासप्रेमींनी या ऐतिहासिक क्षणाला न चुकता उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे.