राजस्थानात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘घरवापसी’साठी राज्यातून ९२ बस रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राजस्थानमधील कोटा येथे लॉकडाऊनमुळं अडकलेल्या महाराष्ट्रातील १ हजार ७८० विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्यातून ९२ बस रवाना झाल्या आहेत. आज रात्री या बस कोटा येथे पोहोचतील. राजस्थानच्या दिशेनं रवाना केलेल्या ९२ बसपैकी ७० बस या राज्य परिवहन विभागाच्या असून, उर्वरित बस खासगी आहेत. या बसेस रायगड आणि बीड जिल्ह्यातून सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्य परिवहन मंडळाच्या बस आज, बुधवारी दुपारी धुळे येथून रवाना झाल्या आहेत. त्या रात्री राजस्थानला पोहोचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बस विद्यार्थ्यांना घेऊन गुरुवारी कोटा येथून पुन्हा महाराष्ट्राकडे रवाना होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र ते कोटा या दरम्यानचा प्रवास साधारण १२ तासांचा आहे. प्रत्येक बसमध्ये दोन चालक असतील. परिवहन विभागानं या बससोबत ब्रेकडाऊन -मेंटेनन्स वाहनही पाठवलं आहे. या बस दोन ते तीन ठिकाणी थांबा घेतील, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवासादरम्यान बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात येणार आहे. प्रत्येक बसमध्ये १९ ते २० विद्यार्थी असतील. त्यांच्यासोबत सरकारी अधिकारीही असतील. राज्यात परतल्यानंतर संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या वैद्यकीय तपासण्या करून त्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन करण्यात येईल. या बसमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यांत पोहोचवण्यात येईल, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment