मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी आहे. अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर आपल्या इच्छित स्थानी पोहोचवण्यासाठी मुंबई लोकल धावत असते. मात्र हल्लीची परिस्थिती काहीशी बदललेली आहे. कारण लोकलला आता तुडुंब गर्दी असते. अगदी लोकलमध्ये चढताही येत नाही अशी परिस्थिती सध्याच्या लोकल मध्ये पाहायला मिळते. त्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवायला लागलाय. मागच्या काही दिवसांपासून लोकल पकडताना अपघात घडल्याच्या घटना आहेत. मात्र आता मुंबईकरांना लोकलला लटकत जाण्याची वेळ येणार नाही. याच समस्येवर लवकरच तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर लवकरच मुंबई लोकलचा प्रवास हा थंडगार होणार आहे. कारण सर्व लोकल गाड्या एसी लोकलमध्ये रूपांतर करण्याची योजना सध्या चर्चेत आली आहे. याबाबत च वृत्त इंडिया टुडे यांनी दिले आहे.
लोकलचा प्रवास होणार थंडगार…
या वृत्तानुसार महाराष्ट्र सरकारकडून लवकरच लोकलचे रूपांतर एसी लोकलमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आधीच लोकलला असलेली गर्दी आणि उन्हाळ्यामुळे होणारी काहिली यामुळे प्रवाशांचा लोकलचा प्रवास हा अधिक त्रासदायक बनतो. मात्र आता एसी लोकल आला तर प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.
… तर सुरक्षेचा प्रश्नही सुटेल
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एसी लोकल आल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही सुटणार आहे. गर्दीमुळे दरवाजात उभे राहिल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. धावत्या लोकल मधून होणारे प्रवाशांचे अपघात आणि मृत्यू हा प्रश्न गंभीर होत आहे. मात्र एसी लोकल मुळे हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. AC लोकलचे दरवाजे बंद असतात त्यामुळे नागरिकांचा प्रवासही सुरक्षित व्हायला मदत होणार आहे.
दरम्यान मुंबई लोकल मधनं 7.5 लाख नागरिक दररोज प्रवास करत असतात. जगातल्या सर्वात जास्त व्यस्त असलेल्या उपनगरीय रेल्वेचं हे जाळ आहे. मुंबईतले लोकलचे जाळे ३९० किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे. यात तीन प्रमुख मार्ग आहेत पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग या तीनही मार्गावर लोकल धावत असतात.