अखेर तो क्षण आलाच! शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; १५ हजार लाभार्थ्यांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर होईल अशी माहिती दिली होती. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

सरकारनं जाहीर केलेल्या यादीत प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश केलेला असून, पहिल्या यादीत ६८ गावातील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावं आहेत. राज्य सरकारनं कर्जमाफी योजनेची अमलबजावणी करण्यापूर्वी ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती संग्रहित केली होती. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. जिल्हा पातळीवर कर्जमाफीच्या अमलबजावणीचं काम सुरू झालं असून सरकारनं कर्जमाफीसाठी पुरवणी मागणी सभागृहात पटलावर ठेवली आहे. यावर २७ फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी चर्चा होणार आहे.पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर, परभणी, अमरावती व पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या जिल्ह्यांतील दोन पात्र लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

काल झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी माहिती देताना आज जाहीर झालेली यादी शेवटची नसेल असं सांगितलं होत. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर केल्या जातील. सरकारनं केलेल्या नियोजनाप्रमाणे सुरूवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल,” असं ठाकरे यांनी सांगितलं होतं.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.