मुंबई । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात येणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर आता राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारला पत्र धाडले आहे. दरम्यान या मुद्द्यावर उदय सामंत यांनी मंगळवारी ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की, अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ नयेत, या भूमिकेवर राज्य सरकार ठाम आहे. आपण विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतोय, याचं भान सगळ्यांना असलं पाहिजे असं सांगितलं.
राजकारण करायला निवडणुका आहेत. अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे योग्य नाही. सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय धक्कादायक असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने UGC छेद दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश कॉलेजचे रुपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. मग परीक्षा कशा घ्यायच्या, असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला.
तसेच देशातील जवळपास १० ते १२ मोठ्या राज्यांनी परीक्षा रद्द केल्या आहेत. या राज्यांशी मी बोलणार आहे. या सगळ्यात राजकारण होत असल्याचे दिसत आहे. राज्य सरकार, विद्यार्थी आणि पालकांसाठी हा निर्णय धक्कादायक आहे. जे कुणी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतायत ते योग्य नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. तसेच अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थांनाही परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र, आता युजीसीने पुन्हा सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याची भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन संभ्रम निर्माण झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”