महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजकडून बुलेट पसंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

छ. उदयनराजे भोसले मित्रसमूहाकडून 2022 चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला बुलेट देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. अखेर कोल्हापूरच्या पृथ्वीराजने राॅयल एनफिल्ड कंपनीची बुलेट पसंत केली आहे. मंगळवारी दुपारी सातारा शहरातील हायवेला असलेल्या शोरूमला भेट दिली. तर उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर याला होंडा युनिकॉर्न मोटारसायकल भेट देण्यात येणार आहे.

उदयनराजे मित्रसमूहाकडून यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुस्त्यांपेक्षा आयोजकांकडून देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेवरून झालेल्या वादाने रंगली. या वादानंतर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांच्यावर खासदार, आमदार यांच्यासह कुस्ती शाैकिनांनी व आयोजकांनी बक्षिसांचा वर्षाव केला. खा. उदयनराजेंनी पृथ्वीराज पाटीलला टाॅप माॅडेल 2 लाखांहून अधिक किमतींची बुलेट मोटारसायकलचे बक्षीस जाहीर केले.

या शब्दाला जागून उदयनराजे मित्रसमूहाने तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात शोरूमला मंगळवारी दुपारी भेट देऊन सिल्व्हर व पर्पल कलरचे क्लासिक 350 हे बुलेटचे टॉप मॉडेल पसंत केले. या मोटारसायकलचे वितरण खा. उदयनराजेंच्या हस्ते पृथ्वीराज पाटीलला लवकरच केले जाणार आहे. त्याच कार्यक्रमात उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकरलाही होंडा युनिकॉर्न मोटारसायकल भेट म्हणून दिली जाणार आहे.

Leave a Comment