बुलेट मिळाली : महाराष्ट्र केसरी “पृथ्वीराजला” छ. उदयनराजे भोसले यांच्याकडून प्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा येथे पार पडलेल्या स्पर्धेतील ‘महाराष्ट्र केसरी’ ठरलेल्या कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलला खासदार उदयनराजे भोसले यांनी बक्षीस म्हणून बुलेट देण्याची घोषणा केली होती. गुरूवारी सायंकाळी छ. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी बुलेट वितरण सोहळा पार पडला.

महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि उपविजेता पैलवान प्रकाश बनकर यांना उदयनराजे मित्र परिवाराकडून दुचाकीचे वितरण करण्यात आले. उदयनराजे यांच्या विजेत्यांना बुलेट, मोटरसायकल तसेच रोख रक्कम दिली गेली. दरम्यान, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला जी बुलेट उदयनराजेंकडून दिली, त्या बुलेटला खास नंबरही घेण्यात आला आहे. उदयनराजे यांच्या ताफ्यातील वाहनांचा (MH-09-GB-007) हा नंबर दिला. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह व श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना Royal Enfield बुलेट गाडी व उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांना होंडा युनिकॉर्न गाडी तसेच गणेश कुंकूले, आकाश माने आणि सुमित गुजर यांना प्रत्येकी 51 हजार रुपये बक्षीस देऊन आज जलमंदिर पॅलेस गौरविण्यात आले. या सत्कार समारंभास महाराष्ट्रातील सर्व मान्यवर पैलवान मंडळी व कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिष्ठेची स्पर्धा महाराष्ट्र केसरीची लढत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने 5-4 च्या फरकाने मुंबई पश्चिमचं नेतृत्त्व करणाऱ्या विशाल बनकरला मात दिली होती. विशेष म्हणजे जवळपास 21 वर्षांनी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली. स्पर्धेतील विजेत्यांना आयोजकांकडून कोणत्याही प्रकारचे बक्षीस दिले गेले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर साताऱ्यातून राजकीय, सामाजिक संस्था यांनी पैलवानांवर बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला होता. यामध्ये छ. उदयनराजे यांनी बुलेट देण्याचे जाहीर केले होते.