कुस्ती दंगल | गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रातल्या टेलिव्हिजनची चंदेरी दुनिया कुस्तीमय झालती. सायंकाळी ६ वाजल्या पासुन ते रात्री दहा पर्यंत घरोघरी कुस्तीचा आखाडा गाजत असलेला दिसत होता. घरात महिला मंडळीच्या आवडत्या मलिकांचे एपिसोड, पुरुष मंडळीचे न्युज प्राईम टाईम, मुलांचे कार्टून चॅनल्स हे सगळे सोडुन लोक टिव्हीवर कुस्ती हा महाराष्ट्राचा रांगडा खेळ अनुभवत होते.
झी ग्रुप ने झी टॉकीज या वाहिनीच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या साहाय्याने आय.पी.एल, कबड्डी लीग आणि दिल्लीत झालेली कुस्ती लीग या धर्तीवरच महाराष्ट्र कुस्ती दंगल घेतली, या स्पर्धेतुन महाराष्ट्राच्या मल्लांना नवं व्यासपीठ मिळवुन देण्याचा मानस होता, हा मानस सफल झाला ही, यामध्ये झी बरोबर महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील अनेक लोकांचे हात राबले तसेच शरद पवारांनी याकडे विशेष दक्ष दिले होते.
कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा गावच्या जत्रा, यात्रा, ऊरसातुन कुस्तीचे फड भरत राहिले. पुढे – पुढे कुस्ती वेळ काळा नुसार बदलत गेली, ती विविध नियमांनी बांधली गेली, मातीतुन थेट मॅट वर गेली आणि जागतिक झाली.
महाराष्ट्राच्या पारंपारिक तांबड्या मातीत कुस्ती खेळणाऱ्या मल्लांना मॅटवरची कुस्ती आत्मसात करायला नेहमीच जिकीरीचं गेलं पण अलिकडे महाराष्ट्राच्या अनेक मल्लानी मॅट वरील कुस्ती आपलीशी मानुन महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार नेला आहे.खाशाबानी ऑलिंपिकचं मेडल मॅट वरच कुस्ती खेळून जिंकलं हा इतिहास आहे आणि या इतिहासाचीच प्रेरणा घेवुन महाराष्ट्राचे मल्ल लढत आहेत. पण अजुन ही बरेचशे मल्ल तांबड्या मातीत अडकून आहेत अनेक कुस्तीप्रेमींना मॅट वरील कुस्तीच्या लढती पाहायला रस नसतो. आंतराष्ट्रीय नियमांनुसार चालणारी आधुनिक कुस्तीच्या लढतीची पद्धत बर्याच लोकांना ध्यानी येत नाही ती नकोशी वाटते कारण कुस्तीच अचुक विश्लेषण समजेल अशा शब्दांत व दृश्य स्वरुपात त्याच्या पर्यंत पोहचवण्याची कमतरता आहे. ही कमतरता झी टॉकीज महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या माध्यमातुन काही प्रमाणात दुर झाली असे नक्कीच म्हणता येईल, प्रेक्षकांनी बर्याच अंशी कुस्तीच्या लढती त्यातील डावपेज व डावपेजांचे आधारे दिलं जाणारं गुणांकन याच आकलन झालं त्यांना कुस्ती आवडायला लागली.
महाराष्ट्रातले अस्सल मल्ल कुस्ती खेळताना अख्ख्या महाराष्ट्राने लाईव्ह पाहिले. जसे क्रिकेट, फुटबॉल, कबड्डीचे सामने टिव्ही वर आता पर्यंत येत होते अगदी तसंच कुस्ती ही आता ग्लॅमर होऊ पाहतेय…
महाराष्ट्र कुस्ती लीगची मुळे आपल्या गावकडच्या तांबड्या मातीत रक्ताच पाणी करुन लढणाऱ्या पैलवानांना टिव्हीवर लढताना पाहून कुस्तीचा नवा थरार अनुभवायला मिळाला.
आता पर्यंत कुस्ती आणि पैलवान प्रसिद्ध पासुन दुर राहिले, माध्यमांनी तितकीशी जागा दिली नाही,
क्रिकेटच्या छायेत आपल्या वाडवडिलांचा, आपल्या मातीतला खेळ झाकोळला होता परंतु या कुस्ती लीग मुळे महाराष्ट्राची कुस्ती, महाराष्ट्राचा पैलवान घराघरात पोहचला गेला.
ज्या माय-माऊल्यांनी आपल्या पैलवान मुलांच्या लढती प्रत्यक्ष कधीच पाहिल्या नव्हत्या अशा या पैलवानांच्या आई वडिलांना आपल्या मुलाची कामगिरी थेट गावाकडे टिव्हीवर दिसत होती आपल्या पैलवान पोराची कुस्ती टिव्हीवर येतेय हे पाहून त्यांचा ऊर अभिमानाने भरुन येत होता….
मराठी सिने सृष्टीतल्या स्टार कलाकारांनी व काही उद्योजकांनी या लिग मध्ये टिम खरेदी केल्या, पैलवान मंडळीना मराठी सिने जगताने या लिगद्वारे चांगले प्रोत्साहन दिले. पैलवानांना प्रसिद्ध व आर्थिक स्थैर्य मिळाल. या लिग मध्ये लढणाऱ्या सहा टिम मधुन पुणेरी उस्ताद संघाने प्रबळ अशा यशवंत सातारा या संघावर विजय मिळवत या लिगचे विजेतेपद आपल्या नावे केलं. यशस्वीपणे या लिगच पहिलं पर्व पार पडलं असलं तरी सादरीकरण आणि आयोजनातील काही त्रुटीमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीतील सर्वोत्तम नव गुणवत्तेला समोर आणण्याचा प्रयत्न थोडासा कमी पडला.
संपुर्ण दंगल मध्ये एकाच ट्रेनिंग सेंटरच्या बर्याच मल्लांचा भरणा झाल्यामुळे बर्याच लढतीत चुरशीचा अभाव होता. कुस्ती हा इर्षेने खेळला जाणारा खेळ, निकोप अशी इर्षा या खेळात निर्माण झाली नाही तर लढत पाहण्यात कुस्तीशौकीना़ना आनंद येत नाही. त्यामुळे एकमेकांन विरोधीतले मल्ल हे ठस्सेल असले की लढतीची मज्जा औरच येते. लिग मध्ये निवड करताना मल्लांच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीचा निकष लावला गेला या मुळे महाराष्ट्रातील अन्य भागातील आखाड्यांचे नामवंत मल्ल या दंगली पासुन दूर राहिले शेवटच्या दोन दिवसात मात्र ही गोष्ट लक्षात आल्याने मॅनेजमेंट अचानक बोलीत नसलेले काही मल्ल लिग मध्ये आयात केले. महिला गटांमध्ये वजनी गटाच्या अपरिहार्यतेमुळे महाराष्ट्राच्या महिला कुस्तीपट्टुना तितकीशी संधी मिळाली नाही.लिग मध्ये हरियाणाच्या दोन तगड्या कुस्तीपट्टुनी सगळा भाव खाऊन टाकला.
या लिग मध्ये कुस्तीची पंढरी कोल्हापूरचा संघ मात्र शेवटी राहिला अन् कुस्तीच केंद्र पुण्याकडे सरकल.
कुस्ती निवेदकांना वेळ न देता कलाकार निवेदकांकडुन मनोरंजनाचा आभास तयार करण्यात आला, जाहिरात बाजीत बराचसा वेळ जात होता, या वेळात महाराष्ट्राच्या कुस्तीचा इतिहास, प्रसिद्ध मल्लांच्या लढतीच्या चित्रफीती दाखवल्या गेल्या असत्या तर आणखीन रंगत आली असती.
लिग मध्ये किरण भगत, माऊली जमदाडे हे मल्ल प्रमुख आकर्षण होेते परंतु दुखातीमुळे हे मल्ल बॅक फुट ला राहिले, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, राहुल आवारे, उत्कर्ष काळे,रणजित नलवडे, सोनबा गोंगाने, कौतुक ढापळे,दत्ता नरळे यांच्या बरोबर नवखा युवा मल्ल आदर्श गुंड याने उत्कृष्ट लढती करत महाराष्ट्राच्या कुस्ती रसिकांची व प्रेक्षकांची मने जिंकली.
महाराष्ट्राच्या कुस्तीला अशा लिगच्या माध्यमातुन आणखीन चांगले दिवस येतील व कुस्ती ही ग्लॅमरस होईल अशी खात्री आहे.
पै.मतीन शेख
+919730121246