मुंबई | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकाधिकारशाहीचा हा पराभव आहे, २०१४ साली मोदींनी दाखवलेल्या दिवास्वप्नाचा आता भ्रमनिरास झाला आहे’ असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राहुल गांधींच्या नेतृ्त्वाखाली मिळालेल्या हा मोठा विजय असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी अत्यंत हीन पातळीवर येऊन प्रचार केला होता. भाजप सरकारच्या विरोधात लोकांच्या मनात राग आहे, तो आता मतदानातून दिसून येत आहे. तसेच २०१९ ला होणा-या लोकसभा निवडणुकीत असाच कल दिसून येईल, असा विश्वास देखील चव्हाण यांनी व्यक्त केला.
१५ वर्षापासून मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये भाजपाची एकहाती सत्ता होती. मात्र मोदींनी दाखवलेल्या दिवास्वप्नामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. आजही लोकांच्या मनात भाजपाविरोधात राग आहे. त्याचा परिणाम आताच्या निकालातून दिसून येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.