एस टी महामंडळाची लालपरी आता नव्या प्रवाहात नवी झाली आहे . राज्यातल्या वाड्या,वस्त्यांवर आजही ही लाल परी आपली चोख सेवा देते. मात्र मागच्या काही दिवसांत लाल परीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मोडकळीस आलेल्या गाड्या , अनियमितता आणि मधेच प्रवासात गाडी बंद पडणे अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून मिळत होत्या. मात्र आता नव्या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
5 हजारहून अधिक गाड्या एसटीच्या ताफ्यात
राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या नवीन बस खरेदीबरोबरच भाडेतत्वावर गाड्या घेण्यावर भर देण्यात येतो आहे. या धोरणानुसार लवकरच 5 हजारहून अधिक गाड्या एसटीच्या ताफ्यात येत आहेत. त्यापैकी 1310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. रोड टेस्टसाठी या बस अवतरल्या असून रोड टेस्ट झाल्यानंतर लवकरच या बस प्रवाशांच्या सेवेत हजर होणार आहेत.
‘या’ शहरात मिळणार नव्या गाड्या
मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरांत लालपरी आता नव्या रूपात अवतरणार असल्याचे समजते. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या 14 हजार बस आहेत. मात्र, या बसेसची दूरवस्था झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने अधिकृत ट्विटर हँडलवरुन नव्या कोऱ्या बसचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तीन बस दिसत असून प्रवाशांना लवकरच बसची सवारी करता येणार आहे.