मराठा आरक्षणाला स्थगिती, पण राज्यात पोलीस भरती होईल; गृहमंत्री देशमुखांची ग्वाही

नागपूर । सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी राज्यात पोलीस भरती (Maharashtra Police recruitment) होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसून पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ते शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. मात्र, आम्ही मराठा नेत्यांशी बोललो आहोत. राज्यात पोलीस भरती होणे आवश्यक असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. ही गोष्ट त्यांनाही पटल्यामुळे मराठा नेत्यांनी पोलीस भरती प्रक्रियेस मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया विना विलंब पार पडेल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्र पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील. 2538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like