राज्यभरात दूध दर आंदोलन पेटलं; कुठं दुधाचा टँकर फोडला, तर कुठं रस्त्यावर दुध दिलं सांडून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला अनुदान द्यावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर रस्त्यावर उतरलीय. सरकारने दुधाला भाव वाढून द्यावा दुध पावडरला प्रति किलोला 50 रुपये अनुदान द्यावे आणि तुप, दुध पावडर, व बटर यावरील जी एस टी कमी करावा अशी मागणी या आंदोलनातुन करण्यात आली आहेये सरकारने राजु शेट्टी यांच्या दुध बंद आंदोलन करत निषेध व्यक्त करून या आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुद्दत दूध बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी टँकरची फोडाफोडी करण्यात आली तर काही ठिकाणी देवाला अभिषेक घालून तर कुठे बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन सुरु झालं. पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून सरकारला गायीच्या दुधाला प्रतिलिटर 25 दर आणि प्रतिलिटर 5 अनुदान देण्याची सद्बुद्धी देण्याची प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली. तुंगत गावांसह परिसरातील दूध बंद ठेवून उत्पादकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. यावेळी ग्रामदैवत श्री तुंगेश्वरालाही ही अभिषेक घालून साकडे घातले.

नगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दूध आंदोलन सुरुच आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावात आजही आंदोलन केलं जात आहे. दगडाला दुग्धाभिषेक घालत हमीभाव मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. दूध दराबाबत किसान सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. डॉ. अजित नवले यांनी कालपासूनच आंदोलन पुकारलं आहे.

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत आंदोलन करण्यात आलं. सरकार रुपी दगडाला घातला दुधाने प्रतिकात्मक अभिषेक, तर दूध फेकून देण्याऐवजी गोरगरिबांना वाटलं, सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. विदर्भातही आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळाले. बुलडाण्यात स्वाभिमानीचे रविकांत तुपकर व स्वाभिमानाचे कार्यकर्त्यांनी दुधाने अंघोळ करून हे आंदोलन केलं आहे. सोबतच घरोघरी जाऊन अनेकांना दूध वाटप करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच ठेवलं दुधात
छावा संघटनेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच दुधात ठेवलं आहे. संकट जावे म्हणून पूर्वी देव पाण्यात ठेवले जायचे आता शेतकऱ्यांचे संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुधात ठेवलं आहे, असं छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत व्हिडीओ देखील ट्विटरवर पोस्ट केला आहे.

दूध खरेदीच्या प्रश्नावर आज बैठक
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी करत आहेत. त्यावर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला महानंद‘ चे अध्यक्ष, दूग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनेचे प्रमुख, तसेच राज्यभरातील दूध संघांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment