हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Railway । मागच्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. अनेक मार्गांवर नवीन ट्रेन धावत आहेत. यामुळे कनेक्टिव्हिटी चांगलीच वाढत आहे. तसेच प्रवास आणि दळणवळण सोप्प झालं आहे. महाराष्ट्राला आता आणखी एक नवीन रेल्वेमार्ग मिळाला आहे. कोल्हापूर ते वैभववाडी (Kolhapur Vaibhavwadi Railway Line) असा हा प्रस्तावित रेल्वेमार्ग आहे. केंद्र सरकार या रेल्वेमार्गाबाबत सकारात्मक असून यामुळे पश्चिम आणि कोकण एकमेकांना जोडलं जाईल. कोल्हापूर जिल्हा सहित कोकणातील एकात्मिक विकासासाठी हा प्रकल्प फारच महत्त्वाची भूमिका बजावेल.
रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत खासदार नारायण राणे यांनी कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचा प्रश्न उपस्थित केला. यानंतर कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाला लवकरच चालना देण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तसेच रेल्वे मार्गाचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर- वैभववाडी या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती मिळेल अशी आशा आहे.
कोकणातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल- Maharashtra Railway
खरं तर कोकणातील उद्योगाला चालना मिळावी, थेट पश्चिम महाराष्ट्र कोकणाशी रेल्वेने (Maharashtra Railway) जोडला जावा, येथील मत्स्य उद्योगालाही नव्याने चालना मिळावी यासाठी कोल्हापूर-वैभववाडी हा रेल्वे मार्ग गेले कित्येक वर्षे प्रस्तावित आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास प्रवासाबरोबरच नवीन औद्योगिक क्षेत्राला ही चालना मिळणार आहे. जलमार्गे इम्पोर्ट, एक्स्पोर्ट या औद्योगिक धोरणालाही नव्याने बळ मिळू शकते. परिणामी यामुळे कोकणातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
दुसरीकडे कराड ते चिपळूण हा रेल्वेमार्ग प्रकल्पही अनेक वर्षांपासून रखडला आहे. तो सुद्धा तयार झाला तर पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ आहे.. कोकणातील उत्पादने याठिकाणी विकता येतील. तसेच दुसरी बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणाऱ्या पर्यटकांनाही रेल्वेचा फायदा होईल.