Maharashtra Rain : राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार!! आज कुठे कुठे बरसणार?

Maharashtra Rain 21 may
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने (Maharashtra Rain)अक्षरशा थैमान घातलं आहे. मागील ४-५ दिवसापासून राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार बॅटिंग करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झालं आहे. काल मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. तर पुण्यातील काही रस्त्यांना अगदी नदीचं स्वरुप आल्याचं दिसून आलं. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यालाही पावसाने झोडपलं आहे. पावसाचं हे सावट अद्याप निवळलं नसून आजही पावसाची रिमझिम अशीच सुरु राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यानं त्याचा प्रभाव मुंबईसह महाराष्ट्रात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रावर दिसणार आहे. त्यामुळं येत्या 22 मे ते 24 मे या कालावधीत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तासांमध्ये किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा वाहणार असून, वाऱ्याता सरासरी वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असेल.

कुठे कुठे बरसणार सऱ्या – Maharashtra Rain

राज्यातील कोकण किनारपट्टी भागासाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. तळकोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली कोल्हापूरातील घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांत नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पुढच्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (Maharashtra Rain) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद –

दुसरीकडे वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे मच्छीमारांना मत्स्यविभागाकडून सूचना जारी करण्यात आल्या असून 1 जून ते 31 जुलैपर्यंत दोन महिने मासेमारी बंद राहणार असल्याचे बोलले जात आहे. खोल समुद्रात मच्छिमार करणाऱ्या मच्छीमारांना आता आपल्या बोटी किनाऱ्यावर दाखल करण्याच्या सूचना मत्स्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हळूहळू या बोटी किनाऱ्यावर येत आहेत.