हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Rain Deaths । महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या या तडाख्यात राज्यातील १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांचे स्थलांतर करण्यात आलं असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
अनेकांच्या घरात पाणी शिरलं – Maharashtra Rain Deaths
संपूर्ण राज्यात पावसाची धुव्वाधार बॅटिंग बघायला मिळत असताना मराठवाड्यात तर अक्षरशः पावसाने थैमान घातलं आहे. मराठवाड्यात पावसामुळे नदी नाले दुथड्या भरून वाहत आहेत, लोकांच्या शेतात पाणी साचलं आहे.. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे, तर अनेक जनावरे वाहून गेली आहेत. खास करून नांदेड जिल्ह्यात परिस्थिती हाताबाहेर जात आहे. नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्यपावसाच्या तडाख्यात 9 जणांचा मृत्यू (Maharashtra Rain Deaths) झाला. मात्र सध्या पाऊस थोडाफार ओसरला असून परिस्थिती सामान्य होत आहे. याबाबत गिरीश महाजन यांनी माहिती देत म्हंटल कि, पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास लष्कराची मदत घेत आहोत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्विट करत म्हंटल,नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. काल येथे झालेला पाऊस सुमारे 206 मि.मी. इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत. एनडीआरएफची 1 चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांची चमू समन्वयातून बचाव कार्य करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पावसामुळे मुंबई सुद्धा तुंबली आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकल सेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. ट्रेनच्या ट्रॅक वर पाणी साचलं आहे. परिणामी सेंट्रल लाईन आणि हार्बर लाईन ठप्प झाली आहे, तर काही मार्गावर धीम्या गतीने रेल्वे वाहतूक सुरु आहे. मुंबई अहमदाबाद हायवेला सुद्धा नदीचे स्वरूप आलं आहे. तारेवरची कसरत करून लोक गाडी चालवत आहेत. काही गाड्या पाण्यातच बंद पडत आहेत. एकूणच काय तर संपूर्ण महाराष्ट्राची पावसामुळे दैना उडाली आहे.




