हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार (Maharashtra Rain Update) पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक महत्वाची शहरे पाण्याखाली गेली आहेत. मुंबई, पुणे कोल्हापूर , चंद्रपूर मध्ये लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. जगबुडी आणि नारंगी नदीला पुन्हा पूर आला आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर पोहोचला आहे. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पुणे, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्या सुद्धा देण्यात आल्यात.
मुंबई सह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी मालाड गोरेगाव कांदिवली दहिसर तसेच सांताक्रुझ वांद्रे या परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आलाय आहे. मुंबई लोकलवर सुद्धा परिणाम पाहायला मिळत आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. पाऊस जर असाच पडत राहिला तर रेल्वेची वाहतूक काही प्रमाणात ठप्प होण्याची शक्यता आहे.
पुण्यास धुवाधार पाऊस – Maharashtra Rain Update
पुण्यात सुद्धा पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचलं आहे. रेस्क्यू टीमच्या साहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. पावसामुळे पुण्यातील ताम्हिणी घाटात मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसेच माणगाव हद्दीत तीन ठिकाणी दरड कोसळून रस्त्यावर माती आलेली आहे. जेसीबी द्वारे बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर दूसरीकडे पुणे-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे.
रायगडमध्येही पावसामुळं (Maharashtra Rain Update) जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचबरोबर, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नद्यांचे पाणी शहरात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळं नगर प्रशासनाने भोंगा वाजवून नागरिकांने सतर्क केले आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे.