कोल्हापूर प्रतिनिधी | पूर परिस्थितीची पाहणी करण्याच्या नावाखाली पूर पर्यटन करायला गेलेल्या गिरीश महाजन यांचा विरोधकांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. त्यांच्या या कृतीला नेटकऱ्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आहे. पूरग्रस्तांच्या जखमा आणखी ओल्या असताना त्यांच्या डोळ्यात सतत ताजे पाणी असताना गिरीश महाजन एनडीआरएफच्या बोटीत बसून चांगलाच हशा पिकवत असतानाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
८ ऑगस्ट रोजी गिरीश महाजन कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले असता एनडीआरएफच्या बोटीत एका कार्यकर्त्यांने त्यांचा व्हिडीओ बनवला. त्यावेळी त्यांनी त्या कार्यकर्त्याला व्हिडीओ बनवण्यापासून रोखले नाही. त्याचप्रमाणे गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावर परिस्थितीचे कसलेही गांभीर्य दिसत नव्हते. एकीकडे राज्यात जनता उपाशी तापाशी बेघर होऊन सरकारी छावणीत राहत असताना गिरीश महाजन मात्र बेदरकारपणे असंवेदनशीलपणे हसीमजाक करत असल्याने त्यांना सोशल मीडियाने चांगलेच झोडले आहे.
दरम्यान “सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! ‘त्या’ लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय गिरीश महाजन मात्र सेल्फीत मग्न आहेत. लाज कशी वाटतं नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा या असंवेदनशील वागण्याची दखल घेणार का?” अशा आशयाचे ट्विट करून विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी गिरीश महाजन यांच्या कृतीचा निषेद केला आहे. त्यांच्या बरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील गिरीश महाजन यांच्या या कृतीचा निषेद केला आहे.