हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील रस्ते विकासाला 2025 हे वर्ष नवी दिशा देणारे ठरणार आहे. कारण अनेक महत्त्वाचे प्रकल्प या वर्षात पूर्ण होणार असून, प्रवाशांच्या सुविधांसाठी नवी दारे खुली केली जाणार आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखद होण्यास मदत मिळणार आहे. हे सर्व प्रकल्प लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. तर चला नव्या वर्षात महाराष्ट्रातील महामार्ग आणि रस्ते विकास प्रकल्पांना वेग याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग –
701 किलोमीटर लांबीच्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा शेवटचा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा, इगतपुरी ते आमने, मार्च 2025 मध्ये सुरू होईल. सध्या नागपूर ते इगतपुरीपर्यंत 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी खुला आहे. या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून, फेब्रुवारी अखेरीस पूर्ण होईल, अशी माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूर प्रवास फक्त 8 तासांत शक्य होईल. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जाणार आहे. तसेच यामुळे देश प्रगतीपथावर पोहचेल .
मिसिंग लिंक आणि खाडी पूल प्रकल्प –
मुंबई-पुणे प्रवासाला अधिक गतिमान करण्यासाठी सुरू असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ 25 मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे लोकांच्या वेळेत बचत होण्यास मदत होणार आहे. ठाणे खाडी पूल 3 या वर्षात पूर्ण होणार आहे. पुलाचा दक्षिणेकडील भाग आधीच प्रवाशांसाठी खुला झाला असून, उत्तरेकडील मार्ग मार्च 2025 मध्ये खुला होईल. या प्रकल्पामुळे ठाणे खाडी पूल 1 आणि 2 वरील वाहतुकीचा भार कमी होईल.
2025 वर्ष कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण-
राज्यातील इतर महत्त्वाचे रस्ते प्रकल्प विविध ठिकाणांमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करतील. विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका कोकण आणि मुंबई दरम्यानच्या वाहतुकीला गती देईल, तर पुणे वर्तुळाकार रस्ता पुणे शहराच्या वाहतुकीचा ताण कमी करेल. जालना-नांदेड द्रुतगती मार्ग मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. या सर्व प्रकल्पांमुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळणार आहे, तसेच 2025 हे वर्ष रस्ते कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.