अजित पवारांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणत्या घोषणा केल्या ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला. अजित पवार नक्की कोणत्या कोणत्या घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. दरम्यान आज जागतिक महिला दिन देखील आहे. याच महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांना देखील चांगली भेट दिली आहे. महिलांसाठी खालील घोषणा करण्यात आल्या आहेत.

महिला व बालविकास विभागासाठी मोठी तरतूद

अजित पवार यांनी महिलांसाठी अन्य महत्वाच्या घोषणाही केल्या आहेत. त्यात महिला आणि बालविकास विभागाला 2 हजार 247 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर केंद्राकडून महिला आणि बालविकास विभागाला 1 हजार 398 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

12 वी पर्यंत विद्यार्थिनींना मोफत प्रवास

मुलींच्या शिक्षणासाठी राज्यातील सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना आपल्या गावातून शाळा, महाविद्यालयापर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाद्वारे राज्यव्यापी योजनेची घोषणा केली. ही योजने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरु करण्यात आली आहे.

राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना

अजित पवार यांनी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा केली. कोणतेही कुटुंब यापुढे राज्यात घर खरेदी खरेदी करेल, ते घर महिलांच्या नावे करण्यातं आलं तर मुद्रांक शुल्कात 1 टक्का सूट देण्यात येईल, असं अजितदादा यांनी सांगितलं आहे. या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2021 पासून होणार आहे. या योजनेमुळे शासनाचा 1 हजार कोटी रुपयांचा महसूल बुडण्याची शक्यता आहे.

घरकाम करणाऱ्या महिलांसाठीही खास योजना

घरकाम करणाऱ्या महिलांसाठीही अजित पवार यांनी एका योजनेची घोषणा केलीय. संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना या नावाने ती ओळखली जाणार आहे. या योजनेसाठी समर्पित कल्याण निधी उभारण्यात येणार आहे. तर राज्य सरकारकडून या योजनेसाठी 250 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like