MAHARERA : घर खरेदीदारांना कोणत्याही फसवणुकीला सामोरे जावे लागू नये. त्यांना नियमाप्रमाणे चांगले घर मिळावे बिल्डर कडून कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी महरेरा कडून अनेक चांगल्या नियमावली बनवून देण्यात आल्या आहेत. आता या नियमावली मध्ये आणखी एका नियमाची भर पडली असून प्रकल्पावर आधारित ‘गुणवत्ता हमी प्रमाणपत्र’ बिल्डरला प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी सादर करणे आणि हे वेबसाईटवर देखील जाहीर करणं बंधनकारक करण्यात आले आहे.
तुम्ही राहत असलेल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे सामग्री वापरली गेली आहे? कोणत्या प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत? याची माहिती आता सार्वजनिक रित्या उपलब्ध होणार असून याचा फायदा ग्राहकांना चांगल्या पद्धतीचे घर घेण्यासाठी सुद्धा होणार आहे.प्रत्येक बिल्डर आपला प्रकल्प सर्वच बाबतीत उत्तम आहे असा दावा करत असतो परंतु इथून पुढे तशी हमी (MAHARERA) बिल्डरला महारेरा मार्फत ग्राहकांना दरवर्षी द्यावी लागणार आहे. चला जाणून घेऊया याच नियमाबद्दल…
बिल्डरांची जबाबदारी वाढली (MAHARERA)
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराकडून राज्यातील सर्व बिल्डरांना यापुढे हा नियम लागू राहणार आहे. याबाबतचे प्रमाणपत्र प्रकल्प अभियंते प्रकल्प परिवेक्षक यांनी प्रमाणित करून दिल्यानंतरच बिल्डरांना सर्व बाबींची पुन्हा एकदा खात्री करून गुणवत्ता हमीच प्रमाणपत्र स्वतः सादर करावे लागणार आहे. एवढेच नाही तर हे प्रमाणपत्र त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा त्यांना द्यावं लागणार आहे. त्यामुळे आता बिल्डरांची जबाबदारी वाढली असून ग्राहकांना मात्र चांगल्या पद्धतीची घरं उपलब्ध होण्याची आशा आणखी एकदा वाढली आहे.
हमी प्रमाणपत्र बंधनकारक (MAHARERA)
याबाबतीत महारेरांना डिसेंबर मध्ये सल्लामसलत पेपर जाहीर केला. त्यावर आलेल्या प्रतिसादावर परिपत्रक जाहीर केलं. त्यावर 23 मे रोजी सूचना मत मागवली होती. आलेल्या सूचना मत आणि या क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी बोलल्यानंतर हे गुणवत्ता हमी प्रमाणपत्र अंतिम करून ते आता बंधनकारक करण्यात आलं आहे.
याबाबत माहिती देताना महारेराचे अध्यक्ष अजय मेहता यांनी सांगितले की, कोणत्याही क्षेत्रात गुणवत्तेसाठी आग्रह धरला जातो. आता गृहनिर्माण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. बांधकाम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी महारेरा प्राथमिक मापदंड (MAHARERA) ठरवण्यासाठी डिसेंबर पासून प्रयत्नशील आहे. नवीन प्रकल्पातील घरात ग्राहक प्रत्यक्षात राहायला गेल्यानंतर त्याला अडचणी येऊ नयेत म्हणून आता काळजी घेतली जात असून बिल्डर आता जी माहिती देईल ती सर्वांना सार्वजनिकरित्या उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे यात बिल्डरच्या विश्वासाचा प्रश्न निगडित असल्याने बांधकामाबाबत ते अधिक सजग होतील परिणामी खरेदीदारांना चांगलं घर मिळेल. असे मेहता यांनी सांगितले.
बिल्डरला कोणती माहिती देणे बंधनकारक? (MAHARERA)
- बिल्डरने ज्या मातीमध्ये हा प्रकल्प उभारला आहे त्या मातीची चाचणी केली आहे का?
- प्रकल्पासाठी संरचना अभियंता नेमला आहे का?
- कामांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी नोंदवही प्रकल्प स्थळी ठेवली आहे का?
- बांधकामासाठी वापरलेल्या सामग्रीची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रकल्प स्थळी चाचणीची सोय आहे का?
- बहुमजली इमारत असल्यास भूकंप रोधक यंत्रणा आहे का?
- गरजेनुसार पूर प्रतिबंधक तरतूद आहे का?
- काँक्रीट, स्टील, इलेक्ट्रिक वायर, प्लंबिंग आणि मलनिस्सारण फिटिंग्ज ही सामग्री प्रमाणित आहे का?
- बांधकामासाठी योग्य पाणी वापरलं आहे का?
- भिंतीत गळती आणि दमटपणा राहणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेतली आहे का?
- त्र्यस्थनमार्फत प्रकल्प स्थळी बांधकाम काळात आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता चाचणी घेतली असेल तर त्याचा तपशील असावा.
- अग्निशामक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत का? असेल तर त्याचा तपशील