सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13 वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शंभू महादेवाला अभिषेक करण्यात आला. उदयनराजे भोसले यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र भाजप ओबीसी युवक मोर्चाचे करणभैया पोरे, सुनिल काटकर हे उपस्थित होते. यावेळी बडवे समाज यांच्या वतीने छ.उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे महाशिवरात्रीस प्रशासनाने अनेक निर्बंध घातलेले होते. त्यामुळे भाविकांना मंदिरात जावून दर्शन घेण्यास बंदी होती. परंतु चालूवर्षी निर्बंध शिथिल झाल्यामुळे सातारा जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांनी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
सातारा शहरात कोटेश्वर मंदिर, कराड तालुक्यातील आगाशिव डोंगर, सदाशिवगडावर भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच ग्रामीण भागातही महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रम दिवसभर सुरू होते. तसेच महादेवांच्या पिडींस अभिषेकही घालण्यात आले.
साताऱ्यात दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या संगम माहुली येथील काशी विश्वेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करत महादेवाचे दर्शन घेतले.