पुणे | साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगीकारलेल्या महात्मा गांधीजींचं आयुष्य हे अनेकांसाठी कुतूहल राहिलं आहे. अशावेळी झपाट्याने पुढे जाणाऱ्या यंत्रयुगात एक तरुण ज्यावेळी हा साधेपणा अंगीकारून गांधी विचार लहान मुलांपर्यंत पोहचवतो, त्यावेळी नक्कीच म्हणता येतं – गांधी अब भी जिंदा हैं !!
निलेश शिंगे या पुण्यात राहणाऱ्या तरुणाने चंग बांधला – शाळेतील मुलांपर्यंत गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांची माहिती पोहचविण्याचा, त्यांना सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा आणि आरोग्याबद्दल जागरूक करण्याचा.. आणि हाच संकल्प आज पूर्ण करून दाखविला.
केशवनगर, मुंढवा येथून सुरु झालेला हा प्रवास – मगरपट्टा सिटी – हडपसर गाडीतळ – कावडी पाट टोल नाका – थेऊर फाटा – तारमळा जि. प. शाळा – कोळवडी मांजरी रोड मार्गे पुन्हा केशवनगर पर्यंत चालला.
तारमळा, थेऊर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज गांधी जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. सुरुवातीला प्रतिमपूजन झाल्यानंतर निलेशने आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्या मनोगतात त्याने गांधीजींची श्रमप्रतिष्ठा, वेळेचं नियोजन, सत्य व अहिंसेबद्दल असलेला ठामपणा, त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेतलेल्या व्यक्तींची माहिती, सत्याग्रहाचे अस्त्र, शिक्षण आणि गांधीजींच्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या. भारतीय राजकारणातील महत्वाच्या टप्प्यावर गांधीजींची भूमिका कशी होती? यावरही त्याने थोडक्यात माहिती दिली. याशिवाय लाल बहादूर शास्त्रींच्या शांत, संयमी स्वभावासोबत त्यांची शेतकरी व जवानांप्रती असलेली बांधिलकी मुलांना समजावून सांगितली. अत्यंत सोप्या भाषेत त्याने या सर्व मुद्द्यांची मांडणी केली. आज शाळेने स्वच्छता कार्यक्रमसुद्धा हाती घेतला होता. त्यालाही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
निलेश हा ३८ वर्षीय तरुण, खराडी येथील EON आयटी पार्क मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत आहे.
अभिनंदन व इतर माहितीसाठी संपर्क –
निलेश शिंगे – 9766349754