‘या’ कारणामुळे महात्मा गांधी पत्रकारितेकडे वळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महात्मा गांधी जयंतीविशेष | अनु बंदोपाध्याय

इंग्लंडला गेल्यावरच गांधी वर्तमानपत्राचे नियमीत वाचक झाले. भारतात असताना शालेय जीवनात त्यांनी कधी वर्तमानपत्र वाचण्यात रस घेतला नव्हता. त्यात ते इतके लाजाळू स्वभावाचे होते की ३-४ लोकांच्या समुहात सुद्धा काही बोलताना त्यांचे तत-पप व्हायचे. वयाच्या २१ व्या वर्षी गांधींनी ‘वेजिटेरिअन’ नावाच्या एका इंग्रजी मासिकासाठी नऊ लेख लिहीले. गांधींचं मासिकासाठीचं बहुदा तेच पहीलं लिखान असावं. त्यामधे त्यांनी शाकाहार, भारतीय खानपान, संस्कृती यावर लिखान केले. गांधी त्यांना जे सुचतं, जो त्यांचा आतला आवाज त्यांना सांगायचा तसंच लिहायचे. त्यामुळे त्यांच्या लिखाणाची शैली सरळ आणि सोप्या भाषेत लिखान करण्याची झाली. वयाच्या २३ व्या वर्षी गांधींनी पत्रकारितेचा रस्ता धरला आणि शेवट पर्यंत त्यांनी सच्या पत्रकाराची भुमिका निभावली. गांधींनी कधीच कोणते लिखाण केवळ प्रभाव पाडण्यासाठी वाढवून चढवून केले नाही. गांधीजींच्या लिखानाचे एकच उद्दिष्ट होते ते म्हणजे सत्याची सेवा करणे आणि लोकांना जागृत करणे.

दक्षिण आफ्रिकेत आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी गांधीजींना न्यायालयात अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. घडलेला प्रकार गांधींनी एका वर्तमानपत्रात लिहीला आणि अन्यायाला वाचा फोडली. वयाच्या ३५ व्या वर्षी गांधींनी ‘इंडियन ओपिनिअन’ या सप्ताहिकाची सुरुवात केली. त्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना एकजुट करण्याचा प्रयत्न केला.

गांधीना आपल्या लेखनीच्या माध्यमातून लोकांचे विचार बदलायचे होते. भारतीय आणि इंग्रज यांच्यातील गैरसमज दूर करण्याचा गांधी नेहमी प्रयत्न करायचे तसेच भारतीयांच्या कमतरतांवर बोट ठेवून सुधारणावादी दृष्टीकोनसुद्धा मांडायचे. स्वत;ला पुर्णपणे झोकून देऊन त्यांनी अनेक लेख लिहिले. दक्षिण आफ्रिकेतील आंदोलन यशस्वी करण्याकरता आपली मते लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता गांधींनी वर्तमानपत्राचा प्रभावी वापर केला. गांधीच्या लेखांमधूनच भारतात किंवा अन्य देशांतील त्यांच्या वाचकांना दक्षिण आफ्रिकेतील घडामोडींची माहिती मिळत असे. भारतात गोपाळ कृष्ण गोखले, इंग्लंडमधे दादाभाई नौरोजी, रशियामध्ये टाॅलस्टाॅय असे अनेक प्रतिभावंत लोक गांधींच्या लेखांचे वाचक होते. दहा वर्ष गांधींनी या साप्ताहिकासाठी झटून काम केले. आठवड्याला दोनशेहून अधिक वाचकांची गांधींना पत्रे यायची. त्या सर्व पत्रांना गांधी जाणीवपूर्वक उत्तरे द्यायचा प्रयत्न करायचे. शिवाय त्यातील विशेष महत्वाची पत्रे आपल्या दैनिकात छापायचे.

“वर्तमानपत्र हे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक प्रभावी आणि शक्तिशाली माध्यम आहे” हे गांधींना चांगलेच समजले होते. परंतु गांधीजींनी कधीच पत्रकारितेला आपल्या उपजीविकेचे साधन बनवले नाही. गांधीजींसाठी पत्रकारिता एक सेवा होती. ‘पत्रकारितेला कधीच उपजिवीकेचं साधन बनवू नये’ असे त्यांचे मत होते.
‘संपादक आणि पत्रकारांनी नेहमी देशाचे विचार समोर ठेवून काम करायला हवे, काहीही झाले तरी कायम सत्याचा पुरस्कार करायला हवा’ असे त्यांचे ठाम मत होते. लोकांच्या ह्रदयात स्थान मिळवायचं असेल तर लोकांच्या प्रश्नांना वर्तमानपत्रातून वाचा फोडायला हवी असे ते म्हणत.

अनु बंदोपाध्याय
(मूळ इंग्रजी मधे प्रसारित)
(भाषांतर – योगेश जगताप)

Leave a Comment