वर्धमान महावीरांची शिकवण आणि अनेकांतवाद म्हणजे काय?

0
521
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धमान महावीर जयंती विशेष | जैन तत्वज्ञानाचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळख असणारे वर्धमान महावीर यांची आज जयंती. जैन धर्म ही  एक श्रमण परंपरा आहे. याची नेमकी सुरुवात कशी झाली हे सांगता येत नाही. पण या धर्माच्या तत्वांचा प्रसार करणारे एक प्रवर्तक म्हणून महावीर हे या धर्माचे नवप्रवर्तक मानले जातात. जैन तत्वज्ञान लिखित स्वरूपात जगासमोर आणणारे तीर्थंकर म्हणून त्यांची ओळख आहे. पुराण काळात वैदिक दर्शने (सत्य जाणण्याची पद्धत) महत्वाची मानली जायची. यापैकी १६ दर्शने महत्वाची मानली जातात. त्यातही ६ दर्शने अत्यंत महत्वाची मानली जायची. यातील नास्तिक (वेदांना प्रमाण न मारणारी) दर्शने म्हणजे चार्वाक, बौद्ध आणि जैन होत. यांनाच ऐहिक दर्शने असेही म्हणतात. बौद्ध आणि जैन या दोन्ही दर्शनांमध्ये अवतार मानले जात नाहीत. ते असे म्हणतात “प्रत्येक व्यक्तीमध्ये उच्चत्वाला जाण्याची पात्रता असते.” यांचे मूळ तत्व हे मोक्ष असते. उत्तम जगण्यासाठी स्वतःमधील वाईट जाणिवा शांत करणे यालाच मोक्ष मानले जाते. आणि प्रत्येक व्यक्ती मोक्षप्राप्तीपर्यंत जाऊ शकतो.

वर्धमान महावीरांच्या जन्माविषयी 
असं म्हटलं जातं की, त्यांची माता त्रिशुला यांनी त्यांच्या जन्माआधी १४ स्वप्ने पाहिली होती. जैन तत्वज्ञानात मुलाच्या जन्माआधी आईने १४ स्वप्ने बघितली तर जन्माला येणारे मूळ हे ईश्वरी असते असे मानले जाते. महावीरांचा जन्म राजघराण्यात झाला. बुद्धांप्रमाणेच ऐहिक सुखांचा त्याग करून जगण्याचे सार शोधण्यासाठी ते घराबाहेर पडले. ३० व्या वर्षापर्यंत सांसारिक जीवन जगून १२ वर्षे ते बिहारसहित उत्तरेकडच्या भागात भटकत राहिले. जो मन, मेंदू आणि ईच्छांवर विजय मिळवितो त्यालाच मोक्षप्राप्ती होते या जैन धर्मातील तत्वज्ञानासाठी ते भटकत राहिले. ते जेव्हा फिरत होते तेव्हा काही लोकांनी त्यांना चोर समजून मारण्याचा प्रयत्नही केला. एकदा ते जात असताना त्यांचे वस्त्र काट्यांमध्ये अडकले. तेव्हा त्यांनी वस्त्रत्याग करून दिला. जसजसे ते पुढे गेले फिरत राहिले तसतसे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि मग त्यांनी आपले ज्ञान इतरांना द्यायला सुरुवात केली. पुढे त्यांना अनेक शिष्यही मिळत गेले. भगवान महावीर हे २४ वे तीर्थंकर मानले जातात. ज्यांनी सत्य, अंहिसा, अस्तेय आणि अपरिग्रह या तत्वांसोबत ब्रह्मचर्य हे एक अधिक तत्व सांगितले.

महावीरांनी स्वतःहून कुणालाच उपदेश केला नाही. जे त्यांच्याजवळ आले त्यांचे शिष्य झाले. आणि त्यांनाच त्यांनी हे तत्वज्ञान दिले. बिंबिसार आणि अजातशत्रूसारखे राजे महाराजे महावीरांना गुरु मानत असत. त्यांनी आपल्या अखंड प्रवासात कोणताच मध्यममार्ग स्वीकारला नाही. केवलज्ञानी होण्यासाठी सर्व प्रकारच्या कठोर परीक्षांमधून गेले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. आणि म्हणूनच संसाररूपी समुद्राला पार करून जर मोक्ष मिळवायचा असेल तर त्याला कोणताच मध्यमार्ग नाही असे त्यांनी सांगितले. महावीरांनी पंचतत्वांसोबत एक महत्वाची गोष्ट शिकविली ती म्हणजे अनेकांतवाद. यामुळेच वर्तमान काळातही त्यांचे विचार अत्यंत महत्वाचे ठरतात. त्यांनी सांगितलेल्या पंचतत्वांमध्ये सत्य – म्हणजे नेहमी सत्य बोला, सत्याचा स्वीकार करा. अंहिसा – जगा आणि जगू द्या, कुणाच्याही कोणत्याच गोष्टीवर अतिक्रमण करू नका, मांसाहार वर्ज्य करा. एकांतिक पद्धतीने अहिंसा होऊ शकत नाही त्यामुळे अनेकांतवादाचा स्वीकार करा. अस्तेय – चोरी न करणे. अपरिग्रह – अनावश्यक गोष्टीचा संग्रह न करणे. आणि ब्रम्हचर्य – मोक्ष प्राप्तीसाठी ब्रम्हचर्य पाळणे. यांचा समावेश होतो.

महावीरांनी या पंचतत्वांसोबत योग्य विचार, योग्य आचार आणि योग्य विश्वास ही त्रिसूत्रीदेखील सांगितली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेकांतवाद अर्थात कोणत्याही गोष्टीच्या अनेक बाजूनी विचार करूनच त्याचे अंतिम मत ठरवावे. जशी आपली एक बाजू असते तशी इतरांच्याही काही बाजू असतात त्या देखील विचारात घ्याव्या हाच महावीरांच्या संदेशाचा गाभा होता. आज देश कोरोना सारख्या आजाराशी झगडत असताना वर्षानुवर्षे सुरु असणारे वाद पुन्हा नव्याने उदयास येत आहेत. अशामध्ये आजच्या दिवशी किमान अनेकांतवाद समजून घेता आला तरी खूप झाला असं मानायला हरकत नाही.

मूळ लेख – स्नेहल मुथा. ([email protected])
शब्दांकन – जयश्री देसाई (9146041816)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here