केंद्राने हक्काचेही पैसे दिले नाही, अन फडणवीस हवेतील आकडे दाखवतात- अनिल परब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्राला केंद्राकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची माहिती देऊन अभासी चित्रं निर्माण केलं आहे. मात्र, वास्तव चित्रं वेगळच आहे. केंद्राकडेच राज्याचे ४२ हजार कोटींचा निधी थकीत असून करोना संकटाच्या काळातही हा निधी राज्याला मिळालेला नाही. राज्याला केंद्राकडून हक्काचेही पैसे दिले जात नाहीत, मात्र फडणवीस हवेतील आकडे दाखवून अभासी चित्रं निर्माण करत आहेत, अशी टीका राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी केली.

आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीची पोलखोल केली. या पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही फडणवीस यांच्या कालच्या पत्रकार परिषदेतील दाव्यांचा चांगलाच समाचार घेतला.

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य सरकारला २८ हजार १०४ कोटी रुपयांची मदत केली असा दावा काल राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला केला होता. त्याला आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. अनिल परब यांनी राज्याला केंद्राकडून नेमके काय मिळाले? फडणवीसांनी कशी दिशाभूल केली? त्याची सविस्तर माहिती दिली.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत १७२६ कोटी रुपये दिले. पण ही योजना आधीपासूनच लागू आहे. ६ हजारमधील दोन-दोन हजार रक्कम टप्याटप्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होती. त्यात महाराष्ट्रासाठी वेगळं काही नाही. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना केंद्राने ११६ कोटी रुपये दिले. पण २० टक्के रक्कम केंद्र सरकार देते. त्याचबरोबर १२१० कोटी महाराष्ट्र सरकारने दिले. पण देवेंद्र फडणवीस हे सोयीस्कररित्या विसरले. महाराष्ट्रातून ६०० श्रमिक ट्रेन सुटल्या. या मजुरांचा सगळा ट्रेन प्रवासाचा ६८ कोटी रुपये खर्च राज्याने केला. केंद्राकडून एकही पैसा मिळालेला नाही असा खुलासा अनिल परब यांनी यावेळी केला

महाराष्ट्र सरकारला २०१९-२० सालचे हक्काचे १८२७९ कोटी रुपये आणि आता एप्रिल-मे चे २३६९ कोटी मिळालेले नाहीत. ते दिले तरी पुरेसं आहेत. आम्ही या मागणीसाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा करतोय. ४२ हजार कोटींची अपेक्षा होती पण नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाउनमुळे २४ हजार कोटींची तूट आहे. महाराष्ट्राला जीडीपीच्या ५ टक्के कर्ज घेता येईल. हे आम्हाला यांच्याकडून शिकावे लागेल? असा खोचक सवाल परब यांनी फडणवीस यांना केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment