हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जातो. सर्वांच्याच घरी गणरायाचे आगमन झालं असून भक्तांकडून गणेशाला साकडं घातलं जात आहे. एकीकडे गेणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर असल्याने राजकीय आखाडा सुद्धा तापला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या एका विधानाने चर्चाना उधाण आलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊ दे असं साकडं आपण गणरायाला घातलं आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हंटल आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, महाराष्ट्राची राजकारणाची स्थिती सध्या चांगली राहिलेली नाही. जनता महागाईने त्रस्त आहे. पण दुसरीकडे महायुती सरकार आल्यापासून हे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सूडबुध्दीने ईडी सीबीआय सारख्या कारवाया करत आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळलेली आहे . त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत यावं यासाठी मी गणरायाला साकडं घातलं आहे. हे सरकार जावे आणि महाविकास आघाडी सरकार यावे, असं आपल्याला वाटत असं खडसे यांनी म्हंटल.
दरम्यान, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरूनही एकनाथ खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लाडकी बहीण योजना आणली आहे , जनतेलाही ते कळते असं म्हणत ही योजना आणायची होती तर पाच वर्ष पूर्वीच आणायला पाहिजे होती असं मत एकनाथ खडसे यांनी मांडलं. लाडकी बहीण योजनेला माझा विरोध नाही, पण या योजनेसाठी जितका खर्च करण्यात आला आहे तोच खर्च जर धरणे उभारणी ,रस्ते निर्मिती साठी केला गेला तर त्यातून रोजगार ही निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यासाठीही प्रयत्न करायला हवं, असं एकनाथ खडसे म्हणाले.