परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड आज बिनविरोध पार पडली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने, काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेत सत्ता कायम ठेवली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्मलाताई विटेकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पहिल्या अडीच वर्षामध्ये जिल्हा परिषदेत बहुमत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपची मदत घेतली होती. परंतु यावेळी राज्यात लागू झालेला महाविकासआघाडीचा फार्मूला परभणी जिल्हा परिषदेमध्येही दिसून आला. आणि त्यातून महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांनी एकत्रित येत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवडणूकसाठी मोर्चेबांधणी केली होती. पण भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनीही आपला उमेदवार मैदानात उतरवला नाही. त्यामुळे सर्वानुमते ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपदी विराजमान झालेल्या निर्मलाताई विटेकर यांनी ग्रामीण भागातील विकास आपला मुख्य अजेंडा असल्याचे सांगितले. त्या जि.प. चे माजी अध्यक्ष स्व. उत्तमराव विटेकर यांच्या पत्नी असून मागील पंचवार्षिक मध्ये जि.प अध्यक्ष राहिलेले राजेश विटेकर यांच्या मातोश्री आहेत. या निवडीनंतर राष्ट्रवादीतील युवा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान दोन दिवसापूर्वी विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या फार्महाऊसवर झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब झाले होते. यावेळी उपाध्यक्ष निवडीवरून जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे व परभणीचे शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्यामध्ये त्यांचा समर्थक उमेदवार या खुर्चीवर बसावा म्हणून रस्सीखेच होती. परंतु ऐन वेळी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली. दरम्यान पहिल्या अडीच वर्षांमध्ये राष्ट्रवादीला सत्तेत येण्यास मदत केलेल्या भाजपने बाबाजानी दुर्राणी यांच्या फार्महाऊसवर ही उपस्थिती लावली होती त्यामुळे या निवडी बिनविरोध होणार हे दोन दिवसांपूर्वीच निश्चित झाले होते त्याप्रमाणे आज ५४ विरुद्ध ०० अशा मताने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवड करण्यात आल्या पीठासीन अधिकारी यांनी दुपारी ३ वाजता या निवडी अधिकृत घोषित केल्या.
परभणी जिल्हा परिषदेमधील सध्याचे पक्षीय बलाबल :
राष्ट्रवादी काँग्रेस – २३
काँग्रेस – ६
शिवसेना – १३
भाजप – ७
रासप – ३
अपक्ष – २