हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mahayuti MNC Election Formula। आगामी महाराष्ट्र महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. खरं तर महायुतीमध्ये सर्व काही ओके नाही अशा चर्चा मागच्या काही दिवसापासून विरोधकांकडून उठवल्या जात आहेत, शिंदे गट आणि भाजपमध्ये खास करून मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. परंतु आता तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून जागावाटपाचा तोडगा काढला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणुक लढणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपा वेगवेगळे निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईत भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार- MNC Election Formula
महत्वाची बाब म्हणजे नागपूरमध्ये भाजपची ताकद जास्त असूनही मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा मोठेपणा भाजपकडून दाखवला जाणार आहे. दुसरीकडे सर्वांचं लक्ष्य असलेल्या आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त महत्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी जागावाटपावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे Mahayuti MNC Election Formula. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही आहे. भाजपकडून अंतिम फॉर्म्युला जाहीर झाला नसला तरी कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. मुंबईत महायुतीसमोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं आव्हान असेल. कोणत्याही परिस्थितीत यंदा मुंबईत आपलाच महापौर बसवायचा असा चंग भाजपने बांधला आहे. त्यामुळे त्याठिकाणी एकत्रित निवडणूक लढवणेच फायद्याचे असल्याची जाणीव भाजप हायकमांडला आहे.
याउलट, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. मात्र त्यामागचं कारणही तितकंच महत्वाचं आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद समान आहे. अशात, कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी होऊ नये, यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीने मुद्दाम स्वतंत्रपणे निवडणुक लढण्याची वेगळी रणनीती आखली आहे. जेणेकरून विरोधकांना त्याठिकाणी राजकीय स्पेस मिळू नये. नवी मुंबई महापालिकेसंदर्भात अजून तरी कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र तरीही भाजप आणि शिंदे गट एकत्र येऊन लढण्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहेत असं बोललं जातंय.




