जयकुमार गोरेंचे सहकारी महेश बोराटे व दत्तात्रय घुटुगडे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

मायणी येथील मागासवर्गीय मयत व्यक्तीची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनसाठी आ. जयकुमार गोरे यांचा हाय कोर्टाने अर्ज फेटाळून लावला. त्याच्यानंतर या प्रकरणात सहभागी असलेले गोरेंचे सहकारी महेश बोराटे व दत्तात्रय घुटुगडे या दोघांना आज वडूज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील मायणी येथील पिराजी विष्णू भिसे यांचा मृत्यू झाला असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून जमिनीचे बोगस दस्तऐवज तयार करण्यात आले होते. यामध्ये भिसे कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद नोंदवली होती. त्यानंतर त्यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी संबंधित आरोपीना अटकही करण्यात आली होती.

दरम्यान, बोगस दस्तऐवज फसवणूक प्रकरणी भिसे यांच्या नावाने सह्या करणाऱ्या संजय काटकरला पोलिसांनी याआधीच अटक केली. तसेच न्यायालयाने त्याला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, गोरेंचे सहकारी महेश बोराटे व दत्तात्रय घुटुगडे यांच्याबाबत वडूज न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला असून दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

Leave a Comment