हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लाल डिम लाईटीत गरुडाच्या तोंडाचा आकार असलेल्या झाकणाची व्हिस्कीला थोडं कानं करून पप्पा थोडाचं ग्लास भरायचे आणी त्यात दोन आइस क्यूब टाकून बेडरूम च्या डाव्या कोपऱ्यात भिंतीच्या आत असलेल्या कप्प्यात व्यवस्थित रचलेल्या ऑडियो कॅसेट्स पैकी त्यांची नेहमीची आवडती कॅसेट प्ले करायचे. गाण्याचे सुरवातीचे संगीत ऐकू आले की मी घरात कुठे पण असलो की तिथे जाऊन पोहचायचो. माझ्या चार पाच वर्षाच्या मनाला त्या मंद लाईटच आणी स्पीकर म्हधून ऐकू येणाऱ्या “कभी कभी ” ह्या गाण्याचं प्रचंड आकर्षण होत बहुतेक म्हणूनच की काय गाण्याच्या बीटवर झप झप खाली वर होणाऱ्या त्या ऑडिओ सिस्टिम वरच्या रंगींबेरंगीं लाइट्स कडे मी एक सारखं बघत किती वेळ तसाच गाणे ऐकत पडून असायचो…
नंतर बरेच वर्ष गेलीत . ती बेडरूम आणी गाव आम्ही कधीच सोडल होत. त्या बेडरूम म्हधल्या कॅसेट साठी असलेल्या कप्प्याची जागा आता विनअँपच्या प्लेलिस्टने घेतली होती.जुन्या गण्यासोबत आता, ए.आर.रहमान, जल द बँड, रेत, नव्याने ऐकत होतो. घरात येणाऱ्या त्या गरुडाच्या बाटलीचा आकार पण आता बद्दलला होता पण पप्पांची प्लेलिस्ट कामय तीच होती. जाणते अजाणतेपणी त्या सगळ्या गाण्यांनी आयुष्यात एक वेगळीच जागा घेतली होती. माझ्या अवती भवती असणाऱ्या जिवंत माणसांसारखाच त्यांचा वावर जिवंत झाला होता. “जीवन के सफर मे राही” गाण्याच्या ओळी आता अधिक जवळच्या आणी जास्त समजत होत्या.
कॉलेज मध्ये असताना एक वृत्तपत्राच्या पुरवणीत “चलो एकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो” शीर्षक असलेला एक लेख वाचण्यात आला होता.ते शीर्षक प्रचंड आवडलं. मनाचा मोह अनावर होऊन ती ओळ माझीच आहे की काय असं समजून मी त्याच्या पुढे अजून स्वतःचे दोन शब्द ऍड करून डायरी म्हध्ये लिहून ठेवलेत. मनाच्या आत बाहेर आता खूप उलथा पालथ होत होत्या. त्याचं दरम्यान मी प्यासा बघितला. डोकं सून झालं. प्यासाची गाणी डोक्यात त्या ऑडिओ टेपच्या रंगींबेरंगीं लाईटी सारखी झप झप बीट पकडून खाली वर होत होती.
आता डोळ्या खालून बरीच मराठी इंग्रजी पुस्तकं जात होती अश्यातच एका मित्राच्या आणी लेखकांच्या संदर्भातुन उर्दू शायरीत प्रचंड कुतूहल निर्माण झालं.आणि एक वेगळ्याच प्रकारचं आणी खूप प्रभावी संगीत नव्याने ह्या शब्दानंमध्ये दिसत होत.अहमद फ़राज़, फ़ैज़ अहमद फ़ैज़, बशीर बद्र ह्यांच्या सोबत ओळख झाली आणि ह्या सगळ्यांत साहिर लुधियानवीच्या शब्दांनी झोप उडवली. ज्याचा नावाचाच अर्थ जादूगार होतो अशा माणसाचा शोध सुरु झाला.
मला काहीतरी सापडलय असं स्वतःलाच ओरडून सांगावस वाटत होत तेव्हा, रात्रीचे तीन वाजले होते बाहेर पाऊस पडत होता पावसाचं पाणी खिडकीतून आत येत होत म्हणून त्या आधीच बंद केल्या होत्या. लाल डिम लाईटीच्या मंद प्रकाशात ‘मैं पल दो पल का शायर हूँ” गाणं वाजत होत. जे संगीत कित्येक वर्षा पासून माझ्या प्रत्येक भाव भावनांना सोबत देत आलयं. ज्या गाण्याच्या दोन ओळी मी माझ्याच समजून लिहून ठेवल्या होत्या. जे शेर,नज्में, वाचून मी रात्र रात्र झोपलो नव्हतो. मी जे अगदी लहानपणा पासून ऐकत आलोय. संगीतकार आणी गायकानच्या ओझ्या खाली जे शब्द कोंडले गेले होते. त्या प्रत्येक शब्दामागे फक्त एकच व्यक्ती होता तो म्हणजे ‘साहिर लुधियानवी’
माझ्या जीवन प्रवासातला अदृश्य सहप्रवासी,
मी ताडकन उठलो, कित्येक महिन्यांपासून अडगळीत पडलेलं लाईटर शोधल. खिडकी उघडली तोच पावसाचे थेंब चेहऱ्यावर आदळू लागले, तसंच ओल्या चेहऱ्याने वरती आकाशा कडे बघतांना मला स्पष्ट दिसत होत ब्रह्माण्डाच्या कुठल्याश्या अनोळखी कोऑर्डिनेट्स वर साहीर आणि मी समोरासमोर उभे होतो. तीच गरुडाचं तोंड असलेली मोठी काचेची बाटली हातात पकडून साहीर माझ्याकडे बघून हसत होता….
– सुमित अशोक ढिवरे.
Email id – [email protected]