Tuesday, June 6, 2023

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजना लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृतीसाठी – मिनाज मुल्ला

सातारा । कोव्हीड १९ च्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी. तसेच कोव्हीड १९ चा संसर्ग पसरु नये व झाला तर कोणती काळजी घ्यावी याची माहिती लोकांना मिळावी हा एकमेव उद्देश माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचा आहे. लोकांमधील कोव्हीड १९ च्या संशयित रुग्णाचा तात्काळ शोध घेण्याकरीता ५० कुटुंबामागे एक टीम नियुक्त करण्यात आली असून येणाऱ्या काळामध्ये कोरोनाचा बिमोड करुन प्रत्येकाच्या घरांपर्यंत पोहचत कोव्हीड १९ च्या संशयित रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती सातारा जावलीचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली.

मार्चपासून उदभवलेल्या कोरोना परिस्थितीत चार महिन्यांत कोव्हीड १९ चे प्रमाण कमी होते. मात्र अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले. शासनाकडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेअंतर्गत लोकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून काम सुरु करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांची आॅक्सिजन लेव्हल आणि शरीराचे तापमान पाहणार आहेत. त्याचबरोबर कोमाॅरबीड व वृद्ध लोकांचा सर्वेक्षण करत त्यांच्यावर देखील औषधोपचार केले जाणार आहेत. न्यूमोनिया आणि सर्दीवर देखील या योजनेतून उपचार करण्याची सोय आहे.

ही योजना दोन टप्प्यात राबवली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर हा योजनेचा पहिला टप्पा असेल. तसेच दुसरा टप्पा १५ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबरपर्यंत राबवला जाणार आहे. दिवाळीपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यशस्वी झालो तर खुल्या अंगाने आणि थोड्याशा मोकळ्या वातावरणात आपल्याला दिवाळी सणाचा आनंद घेता येईल. म्हणूनच सर्व नागरिकांनी नियमांचं पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.