सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पर्यावरण दिनाचे निमित्त साधून नगरविकास विभागाचे अपर सचिव मनोहर बंदपट्टे यांनी 4 नगरपालिका विभागांतर्गत नगरपालिकांचे माझी वसुंधरा 3.0 अभियानाचे निकाल सोमवारी जाहीर केले. एक लाख ते तीन लाख लोकसंख्येच्या गट वर्गात सातारा नगरपरिषदेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. पालिकेच्या कामाची दखल घेत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिका मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचा काल गौरव करण्यात आला. ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून सातारा पालिकेला यानिमित्ताने आठ कोटीचे बक्षीस मिळाले आहे.
राज्य शासनाने अमृत योजने अंतर्गत लोकसंख्यानिहाय माजी वसुंधरा अभियान स्पर्धेमध्ये सातारा, कराड, पाचगणी, महाबळेश्वर या चार नगरपालिका व दहिवडी नगरपंचयत यांनी मोठी बाजी मारली. हा गुणानक्रमांक सातारा पालिकेने विविध उपक्रमांच्या जोरावर मिळवला आहे. ‘माझी वसुंधरा 3.0 अभियानांतर्गत डेस्कटॉप असेसमेंट करता साडेसात हजार गुण ठेवण्यात आले होते. यामध्ये सातारा नगरपालिकेने तब्बल 96 टक्के गुण प्राप्त केल्याची माहिती देण्यात आली. या स्पर्धेत भूमी थिमॅटिक मधील सातारा नगरपालिकेची उच्चतम कामगिरी लक्षात घेण्यात आली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि. 5 जून रोजी मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सातारा पालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते.