Wednesday, June 7, 2023

दमलेल्या आईला उचलून घेत त्याने चालायला सुरुवात केली आणि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या लाख पार करून गेली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या पाहता चिंतेचे वातावरण निर्माण आहे. तर उन्हातून आपल्या गावी, आपल्या घरी पोहोचू पाहणाऱ्या कामगार वर्गाची ही दयनीय अवस्था होते आहे. या संकटकाळात आपल्या कुटुंबासोबत हे स्थलांतरित कामगार जीवाचे रान करीत आहेत. पाठयपुस्तकातील श्रावण बाळाची कथा जवळपास सगळ्यांनीच वाचली, ऐकली असेल. ज्यामध्ये आपल्या वृद्ध आईवडिलांना खांद्यावर घेऊन जाणारा श्रावणबाळ हा एक आदर्श मुलगा मानला जातो. सद्यस्थितीही याहून काही वेगळी नाही. कित्येक कामगार आपल्या लहान मुलांसोबत आपल्या वृद्ध आईवडिलांना सोबत घेऊन कधी भर पावसात तरी कधी रणरणत्या उन्हात प्रवास करत आहेत. 

श्रावणबाळाच्या गोष्टीची आठवण येण्यासारखेच एक छायाचित्र योगिता भयाणा यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून शेअर केले आहे. या छायाचित्राविषयी अधिक माहिती घ्यायचा प्रयत्न केला असता हा मुलगा पुण्याहून बनारसला निघाल्याचं समजत आहे. भर उन्हात आपल्या वृद्ध आईसोबत आपल्या गावी पायपीट करत निघालेल्या एका मुलाचे हे चित्र कामगारांच्या भयाण स्थितीचे वर्णन करते आहे. चालून चालून दमलेल्या आपल्या आईला उचलून हा मुलगा प्रवास करताना दिसतो आहे. या ट्विटवर अनेकजण व्यक्त होत आहेत. अशी अवस्था याआधी कधीच झाली नव्हती. इतके असहाय कधी वाटले नव्हते. इथेच आपले सरकार नापास झाले आहे. अशा प्रतिसादासोबत या मुलाचे कौतुकही केले जात आहे. आपल्या आईच्या वेदना मुलालाच समजू शकतात. तुझ्या धैर्याला सलाम अशा शब्दांतून या मुलाचे कौतुक केले जात आहे. 

Covid -१९ ची वाढती रुग्णसंख्या आणि देशातील स्थलांतरित कामगारांची ही अवस्था खूपच धक्कादायक असल्याचे दिसून येत आहे.