हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतीही भाजी बनवताना ती मसाल्याशिवाय चटकदार होणार नाही. आणि बारमाही लागणारा हा पदार्थ असल्यामुळे याची मागणीही खूप असते. त्यामुळे घरच्या घरी मसाले तयार करून त्यातून चांगले पैसेही मिळवता येतात. चला तर मग जाणून घेऊ या… कसा करायचा मसाल्यांचा कमी खर्चात उद्योग करायचे मसाले आणि विक्रीतून केली जाऊ शकते चांगली कमाई
जगात भारतीय खाद्यपदार्थाची ओळख ही फक्त त्यात घालण्यात आलेल्या मसाल्यामुळेच आहे. त्यामुळे बाजारात मसाल्यांची मागणी हि नेहमीच राहते. अगदी सहजपणे सुरु करता येऊ शकणारा हा व्यवसाय आहे. या व्यवसायात खर्च कमी होतो आणि तुम्हाला जास्त नफा मिळवता येतो. अगोदर छोटे युनिट उभारून त्यातून कमी खर्चात मसाल्यासाठी लागणारे पदार्थ खरेदी करावे.
यासाठी सुरुवातीला 5 हजार रुपयांपासून ते 25हजार रुपये लागतील. या पैशांतून कच्चा माल खरेदी करून त्यातून मसाले बनवून त्याच्या विक्रीतून पैसे मिळवता येऊ शकतील. मसाले पॅकिंगसाठी त्याच्या मिश्रणासाठी कमी किमतीच्या असणाऱ्या ग्राइंडिग मिक्सिंग आणि पॅकिगच्या मशिन्स घ्याव्यात. जर सेकंड हँण्ड मिळाल्या तर त्या घ्या जेणेकरून आपला खर्च कमी होईल. त्याच्या खरेदीनंतर छोट्याशा जागेत कच्चा माल तयार करून त्याची उत्तम प्रकारे पॅकिंग करून विक्री केली जाऊ शकते.
मसाला उद्योग सुरू करण्यासाठी खालील परवाने जरूर काढावेत
1) ROC Registration करावे.
2) One Person Company registration सुद्धा करावे.
3) Local Municipal Authority कडून Trade Licence सुद्धा काढावे.
4) Food Operator Licence आवश्यक काढावे.
5) BIS Certificate सुद्धा घ्यावे लागणार आहे.
‘या’ 12 प्रकारचे मसाले कसे तयार कराल?
1) गोडा मसाला (काळा मसाला)
साहित्य : धणे अर्धा किलो, सुके खोबरे पाव किलो, तीळ पाव किलो, खसखस 50 ग्रॅम, हळकुंडे 50 ग्रॅम, प्रत्येकी 20 ग्रॅम लवंग, दालचिनी, शहाजिरे, काळे मिरे, तमालपत्र, मसाला वेलदोडे, दगडफूल, खडा हिंग, प्रत्येकी 10 ग्रॅम जायपत्री, बाद्यान (बदामफूल), जिरे 100 ग्रॅम. कृती : खोबरे तुकडे करून वा किसून भाजून घ्या. तीळ कोरडेच भाजून घ्या. बाकीचे सर्व पदार्थ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरवर बारीक पूड करा. चाळून घट्ट झाकणाऱ्या बरणीत भरा.
2) पंजाबी गरम मसाला
साहित्य : 1 टी स्पून धणे, अर्धा टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 4 ते 5 तमालपत्रे, अर्धा टी स्पून दालचिनी, अर्धा टी स्पून काळे मिरे, अर्धा टी स्पून लवंग, 5 मसाला वेलदोडे व पाव जायफळ. कृती : जायफळ सोडून सर्व मसाला कोरडाच भाजून घ्या. (फार भाजू नका.)
नंतर जायफळासहित मिक्सरवर पूड करून घ्या.
3) कांदा लसूण मसाला
साहित्य : 2 ते 3 कांदे, 15-20 लसूण पाकळ्या, 150 ग्रॅम धणे, 150 ग्रॅम सुक्या मिरच्या, 2 ते 3 दालचिनी, 2 हळकुंडे, 1 टी स्पून लवंगा, 10-12 तमालपत्रे, 10 मसाला वेलदोडे, 1 टी स्पून काळे मिरे, 5 टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 10 ग्रॅम दगडफूल, 5 ग्रॅम बाद्यान, 5 ग्रॅम नागकेशर, 5 टी स्पून खसखस व 100 ग्रॅम तीळ. कृती : वरील सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर एकत्र करून मिक्सरवर बारीक करा.
4) स्पेशल गरम मसाला
साहित्य : पाव किलो काळे मिरे, 100 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम लवंग, 100 ग्रॅम बडीशेप, 4-5 मसाला वेलदोडे, 4-5 हिरवे वेलदोडे, 2 ग्रॅम दगडफूल, अर्धे जायफळ, 2 ते 3 बाद्यान (बदामफुले). कृती : सर्व साहित्य कोरडेच वेगवेगळे भाजून घ्या व पूड करून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.
5) मालवणी मसाला
साहित्य : अर्धा किलो धणे, प्रत्येकी 10 ग्रॅम दालचिनी, लवंगा, बाद्यान, नागकेशर, तमालपत्रे, जिरे, मोहरी, काळे मिरे, बडीशेप, 4-5 मसाला वेलदोडे, 5 ग्रॅम जायपत्री, 5 ग्रॅम शहाजिरे.
कृती : सर्व साहित्य थोड्या तेलावर भाजून घेऊन त्याची बारीक पूड करून ठेवा.
6) कोकणी मसाला
साहित्य : पाव किलो लाल सुक्या मिरच्या, पाव किलो धणे, प्रत्येकी 10 ग्रॅम लवंगा, जिरे, काळे मिरे, मोहरी, प्रत्येकी 5 ग्रॅम दालचिनी, जायपत्री, शहाजिरे, मेथीदाणे, अर्धी वाटी खसखस, अर्धे जायफळ, 25 ग्रॅम बडीशेप. कृती : वरील सर्व साहित्य कोरडेच भाजा व बारीक पूड करून बरणीत भरून ठेवा.
7) कच्चा मसाला
साहित्य : अर्धी वाटी धणे, पाव वाटी जिरे, 5 ग्रॅम शहाजिरे, 5 ग्रॅम लवंग व दालचिनीचा 1 छोटा तुकडा. कृती : सर्व साहित्य कच्चेच मिक्सरवर बारीक करून घ्यावे व ही पूड मसालेभात व खिचडी यासाठी वापरावी.
8) चहाचा मसाला
साहित्य : 150 ग्रॅम सुंठ, 50 ग्रॅम काळे मिरे, 25 ग्रॅम लवंग, 25 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम हिरवे वेलदोडे व 1 जायफळ. कृती : वरील सर्व साहित्य किंचित भाजून गार करा व मिक्सरवर बारीक करा.
9) दूध मसाला
साहित्य : बदाम 50 ग्रॅम, पिस्ते 50 ग्रॅम, काजू 25 ग्रॅम, चारोळी 25 ग्रॅम, 15-20 केशराच्या काड्या, अर्धे जायफळ, 1 टेबलस्पून वेलदोड्याची पूड. कृती : वरील साहित्याची बारीक पूड करा व दूध, बासुंदी, खीर, श्रीखंड इ. पदार्थांसाठी वापरा.
10) सांबार मसाला
साहित्य : धणे पाव किलो, जिरे 100 ग्रॅम, चणा डाळ 100 ग्रॅम, उडीद डाळ 100 ग्रॅम, 1 टी स्पून काळे मिरे, हळद 2 टी स्पून, सुक्या मिरच्या 50 ग्रॅम, पाव वाटी कढीपत्त्याची पाने, अर्धा वाटी सुके खोबरे. कृती : प्रथम डाळी वेगवेगळ्या भाजून घ्या. (करपू देऊ नका.) उरलेले सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. थंड झाल्यावर सर्व एकत्र करून मिक्सरवर बारीक करा व हवाबंद बरणीत भरून ठेवा.