कराड | मलकापूर नगरपरिषदेचे सन 2022-23 या सालाचे अंदाजपत्रक विशेष सभेमध्ये एकमताने मंजुर करणेत आली. सदर अंदाजपत्रकामध्ये सन 2022-23 या सालाकरीता कोणतीही कर वाढ न करण्यात आलेली नाही. सन 2022-23 सालची एकूण महसुली व भांडवली एकूण जमा 69 कोटी 59 लाख 49 हजार 702 एवढी गृहीत धरली असून खर्च 69 कोटी 51 लाख 73 हजार 703 एवढा अंदाजीत असून रक्कम रु. 7 लाख 75 हजार 999 शिल्लकीचे अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले आहे. विशेष सभा नगराध्यक्षा निलम येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, नगरपरिषद् अंदाजपत्रकातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे मलकापुर नगरपरिषदेने लोकसहभागाच्या माध्यमातून यापूर्वी विविध नाविण्यपुर्ण योजना हाती घेऊन यशस्वीरित्या सुरु ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 24×7 नळ पाणीपुरवठा योजना, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, राजमाता जिजाऊ सदृढ माता बालक योजना, महात्मा गांधी दिव्यांग पेंशन योजना या योजनांचा समावेश आहे. गेली 2 वर्षे कोविङ-19 च्या प्रादुर्भावामुळे नगरपरिषदेने कोणत्याही नविन योजना हाती घेतल्या नव्हत्या. तथापि, कोविङ-19 चा प्रादुर्भाव कमी होत असलेने नगरपरिषदेने सिंधुताई सपकाळ, महिला आरोग्य योजना राबविणेचा निर्णय घेतला असून, या योजनेमध्ये मलकापूर शहरातील महिलांची आरोग्य तपासणी करणेत येणार असून, यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी, हिमोग्लोबीन करणेत येणार आहे. यासाठी रक्कम रु. 5.00 लक्ष तरतुद केलेली आहे. त्याचबरोबर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विद्या वेतन योजनेअंतर्गत कॉविड 19 मुळे निराधार झालेल्या विद्याथ्र्यांना शैक्षणिक सुविधेसाठी मदत व्हावी या हेतूने व मुलींच्या शिक्षणासाठी रक्कम रु. 5.00 लक्षची तरतुद करणेत आलेली आहे. कोविड-19 मुळे अडचणी आलेली शेतीची सुधारणा होणेसाठी व पशुधन विकासासाठी रक्कम रु. 5.00 लक्षची तरतुद करणेत आलेली आहे.
त्याबरोबरच नगरपरिषदेने यापूर्वी सुरु ठेवलेल्या आनंदराव चव्हाण शैक्षणिक सहायता निधी, स्वा.से. मा.आ. भास्करराव शिंदे आरोग्य जीवनदायी सहायता योजना, दिव्यांग पेंशन योजना, आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबीयांच्या कल्याणासाठी शौर्य सन्मान योजना, ई-लायब्ररी इत्यादी करीता रक्कम रु. 71.00 लक्षची तरतुद केलेली आहे. शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत योजनेचा लाभ देणेसाठी रक्कम रु.1.21 कोटी ची तरतुद केलेली आहे. गेली 2 वर्षे कोविड-19 मुळे मलकापूर सोलर सिटी योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नागरिकांना देण्यात आली नव्हती. सन 2022-23 या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य शासनाच्या (अपारंपारिक उर्जा विभाग) व मलकापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून सोलर वॉटर हिटर, सौर दिवे तसेच नेट मीटरींग इत्यादीसाठी अनुदान उपलब्ध करुन देणेत येणार आहे. तसेच आजी माजी सैनिक यांना घरपट्टी व इतर सुविधा मिळणेकामी 10.00 लक्ष तरतुद करणेत आली आहे. मलकापूर नगरपरिषदेने सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये अंदाजपत्रकामध्ये कोणत्याही प्रकारची नव्याने करवाढ प्रस्तावित केलेली नाही व कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा नागरिकांच्यावर टाकलेला नाही.