सातारा | एका सोळा वर्षांच्या मुलीशी तरुणाने मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एके दिवशी व्हिडिओ काॅल करून मुलीला कपडे उतरायला लावले. एवढेच नव्हे, तर याचे रेकाॅर्डिंग करून फोटो संबंधित मुलीच्या मामाला पाठविल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आलीय.
राहुल सुर्वे ऊर्फ सत्यम मिश्रा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित सोळा वर्षांच्या मुलीला एके दिवशी व्हॉटस्ॲपवर राहुल सुर्वेने मेसेज केला. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. मात्र, त्यानंतर संबंधित मुलीने त्याला प्रतिसाद देणे बंद केले.
त्यामुळे त्याने मुलीच्या व्हॉटस्ॲपवर अश्लील मेसेज केले. मैत्रीबाबत घरच्यांना सांगेन, अशी त्याने धमकी देत व्हिडिओ कॉल करून कपडे उतरवायला लावले व त्याचे अश्लील फोटो तयार करून मामाला पाठविले. या प्रकारानंतर मुलीच्या नातेवाईक व घरातल्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.