सातारा | सहा वर्षांच्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी स्वत: बायकोचे अपहरण करून तिला मारण्याची धमकी सासूला दिल्याची फिर्याद दाखल झाली आहे. नवरा व त्याच्या मित्रावर मोहोळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी गोरे (रा. टेंभुर्णी रोड, कुर्डू, ता. माढा, जि. सोलापूर) व विठ्ठल माळी (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत स्नेहल तानाजी गोरे, (वय 25, रा. गोरे वस्ती, टेंभुर्णी रोड, कुर्डू, ता. माढा, सध्या रा. विमलविश्व अपार्टमेंट, खेड, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, स्नेहल हिचा नवरा तानाजी यांचा पहिला विवाह झाला होता. ही गोष्ट लपवून त्याने स्नेहल यांच्याशी लग्न केले. या दोघांना तेजस्वी (वय- ६ वर्ष) नावाची मुलगी आहे. ती स्नेहलच्या आईकडे पुणे येथे राहत असते. तानाजीने फसवणूक केल्याचे लक्षात येताच या दोघांचा घटस्फोटाचा खटला आता न्यायालयात दाखल झालेला आहे. खटला सुरू असतानाच तानाजीला मुलगी तेजस्वीचा ताबा हवा आहे. त्यासाठी त्याने मित्र विठ्ठलच्या मदतीने मंगळवारी (ता. 23) ते गुरुवार (ता. 25) या कालावधीत बॉंबे रेस्टारंट चौकातून स्नेहलला कारमध्ये जबरदस्तीने बसविले. त्यानंतर तिचे हातपाय रस्सीने बांधून पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट या भागातून कर्नाटक राज्याच्या सीमपर्यंत नेले. त्यानंतर तिच्या तानाजीने स्नेहलच्या आईला फोन करून “तेजस्वीचा ताबा मला द्या, अन्यथा स्नेहलला जीवे ठार मारतो,’ अशी धमकी सासूला दिली होती.
त्यांच्या ताब्यातून सुटल्यानंतर स्नेहलने मोहोळ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी तानाजी व विठ्ठल यांना बोलावून घेतले होते. चौकशीनंतर मोहोळ पोलिसांनी ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा तपासासाठी सातारा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सुहास रोकडे तपास करत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group