धक्कादायक ! 150 रुपयांवरुन जिगरी दोस्ताची निर्घृणपणे हत्या

चंदिगढ : वृत्तसंस्था – हरियाणातील फरिदाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मित्राने अवघ्या 150 रुपयांवरुन जिगरी दोस्ताची निर्घृणपणे हत्या केली आहे. या हत्येनंतर पोलिसांनी केवळ 48 तासांत या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मृत व्यक्तीचे नाव दलिप आहे तर आरोपी तरुणाचे नाव योगेंद्र असे आहे. आरोपी योगेंद्र आणि मृत दलिप एकमेकांचे चांगले मित्र होते. घटनेच्या दिवशी दलीप ढाब्यावरुन जेवण आणण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर दीडशे रुपयांवरुन योगेंद्र आणि त्याचा वाद झाला. त्यानंतर योगेंद्रने बेदम मारहाण करुन दलीपचा जीव घेतल्याचा आरोप करत दलिपच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?
मृत दलिपच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 29 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचा 26 वर्षीय मुलगा दलीप हा कामावरुन घरी परतला होता आणि जवळच्या ढाब्यावर जेवण आणण्यासाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला तसा तो घरी परातलाच नाही. यानंतर 30 जानेवारीला सकाळी दलीपचा मृतदेह ढाब्यापासून काही अंतरावर असलेल्या एका पुलाजवळ सापडला. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली.

ढाब्यावरील भांडणातून हत्या
या प्रकरणी पोलिसांनी गडखेडा गावातील 23 वर्षीय योगेंद्र याला 1 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. यानंतर आरोपीची चौकशी केली असता योगेंद्र आणि मयत दलीप हे मजुरीचे काम करत होते. घटनेच्या दिवशी दोघेही जेवायला ढाब्यावर गेले होते. योगेंद्रने ढाबा मालकाला पैसे दिले, तर उरलेले 150 रुपये दलीपने ठेवले. यानंतर योगेंद्रने हे पैसे परत मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वाद एवढा विकोपाला गेला कि योगेंद्रने दलीपला बेदम मारहाण करून त्याचा खून केला.