Manipur Violence: मणिपूर येथील कांगपोकपी जिल्ह्यात ३ महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुवारी या घटनेचा व्हिडिओ इंडिजिनस ट्राइबल लीडर्स फोरम सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेत आरोपींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ ४ मे रोजीचा आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या महिला या कुकी समुदायातील आहेत. तर त्यांच्यासोबत मैतेई समुदायातील तरुण छेडछाड करत आहेत. या व्हिडिओमध्ये या दोन्ही महिलांना बंदिस्त करून नग्न अवस्थेत रस्त्यावरून फिरवले जात आहे. मुख्य म्हणजे, यातील एक महिला १९ वर्षीय असून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या सर्व घटनेमुळे मणिपूरमधील वातावरण चांगलेच तापले आहे. गुरुवारी न्यायाची मागणी करत कुकी समुदायाने आंदोलन पुकारले आहे. तर संबंधीत आरोपींवर IPC कलमातंर्गत १५३ ए, ३९८, ४२७, ४३६, ४४८, ३०२, ३५४, ३६४, ३२६, ३७६, ३४ खाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मणिपूरमध्ये दिवसाढवळ्या अशी कृत्य घडत असल्यामुळे विरोधीपक्ष नेत्यांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
नेमके काय घडले?
दरम्यान, या घटनेला २१ दिवस उलटून गेल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. तसेच संबंधित आरोपांवर एका व्यक्तीला मारून टाकण्याचा आरोप देखील लावण्यात आला. गेल्या ३ मे रोजी १ हजार पेक्षा जास्त लोक गावात शिरले आणि त्यांनी तेथे धुमाकूळ घातूल घरे जाळली. यांनतर मदतीसाठी दोन महिला एक मुलगी आपल्या भावासोबत जंगलाच्या दिशेने पळाले. पोलिसांनी या सर्वांना जमावापासून वाचवले होते. मात्र पोलीस ठाण्यात या महिलांना घेऊन जाताना जमावाने सर्वांना आडवले. तसेच पोलिसांकडून महिलांना हिसकावून घेतले.
ज्यावेळी मैतेई समुदायातील तरुणांनी 19 वर्षे मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिचा भाऊ तिला सोडविण्यासाठी मध्ये पडला होता. परंतु त्यालाही या जमावाने तेथेच मारून टाकले. यानंतर या तिन्ही महिलांना जमावाने नग्न अवस्थेत चालण्यास भाग पाडले. या जमावानेच मिळून या तीन महिलांची रस्त्यावरून नग्न अवस्थेत धींड काढली. तसेच एवढे करून न थांबता या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले. सध्या या महिलांवर घटनेचा गंभीर परिणाम झाला आहे. मणिपूर पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे. तसेच मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी देखील या प्रकरणात दखल घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.