हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याना डीडी म्हणजेच देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाला आहे अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यावर अक्षरशः शिव्यांचा पाऊस घातला. माकडा, आमच्या लेकराचं वाटोळं झालं आहे. तू आमच्या नादी लागू नकोस, आमच्यासारख्या गोरगरीब मराठ्यांच्या मध्ये पडू नकोस नाहीतर महागात पडेल असा इशारा जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड याना दिला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, बांडगुळ्या, तू माझ्या नादाला लागू नको, तू किती भ्रष्टाचारी आहे ते मला माहित आहे. मनोज जरांगे जातीसाठी लढतोय आणि तू जात विकून स्वतःच घर मोठी करणारी अवलाद आहेस. तू आपल्या औकातीत राहा, फडणवीसांचे पाय चाट.. आम्हाला काहीही घेणंदेणं नाही पण माझ्या नादाला लागू नकोस.. तुमच्यासारखी मोठी श्रीमंत लोक आमचे भूषण होता मात्र तुम्ही नीच आणि नालायक निघाला. आमच्यासारख्या गोरगरीब मराठ्यांच्या मध्ये पडू नकोस नाहीतर महागात पडेल असं म्हणत जरांगे पाटलांनी प्रसाद लाड यांच्यावर शिव्यांचा पाऊस पाडला.
तू भंगार आहेस. मी कधीही तुमच्यावर आत्तापर्यंत एका शब्दाने काही बोललो नाही त्यामुळे तुम्ही पण औकातीत रहा. तुम्ही फडणवीसांचे आमदार व्हा, मंत्री व्हा, मोठे व्हा .. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पन आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नको. आमच्या लेकराचं वाटोळं झालं आहे. तुम्हाला एवढा राग येतोय तर ठाण्यात पोलीस भरती करणाऱ्या ४०० ते ५०० तरुणांना कुणबी प्रमाणपत्र असूनही बाहेर काढण्यात आलं आणि ओपन मध्ये टाकलं. तुम्हाला जर मराठ्यांबद्दल आस्था असेल आणि मराठाच्या रक्ताचा असशील तर देवेंद्र फडणवीस यांनी हे का केलं हे त्यांना विचारा असं आव्हान जरांगे पाटलांनी प्रसाद लाड यांना दिले.
प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?
मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील ज्या पद्धतीने फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत ते पाहता त्यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाल्याचे दिसून येत आहे. मराठा तरुणांचा विकास व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक बदल केले. नोकऱ्यांमध्येही मराठा आरक्षण ठेवले, मराठा समाजासाठी योजना आणल्या. मराठा समाजासाठी पोलीस भरती, परदेशी शिक्षण, व्यवसाय यासाठी प्रयत्न केले. तरीही जरांगे पाटील कोणाच्या छत्रीखालून फडणवीस यांचा द्वेष करतात ते पाहिले पाहिजे. असा द्वेष योग्य नाही. विशिष्ट व्यक्तींना टार्गेट करून राजकारण करत असाल तर तुम्ही उघडपणे राजकारणात या. अन्यथा समाजासाठी काहीतरी करत असाल तर चर्चेतून मार्ग काढा. चर्चेला आम्ही तयार आहोत, पण द्वेषाचे राजकारण करू नका असं म्हणत प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांवर घणाघात केला होता.